Satara: साडी, मेकअप करून स्वच्छतागृहात ठेवला महिलेचा पुतळा; एका महिलेसह चौघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 04:13 PM2023-12-28T16:13:02+5:302023-12-28T16:13:16+5:30

सातारा : येथील रविवार पेठेतील महिलांच्या स्वच्छतागृहात महिलेला साडी नेसवून, मेकअप करून पुतळा ठेवणाऱ्या चार जणांना सातारा शहर पोलिस ...

Statue of woman in sari, make-up placed in toilet in Satara; Four arrested including a woman | Satara: साडी, मेकअप करून स्वच्छतागृहात ठेवला महिलेचा पुतळा; एका महिलेसह चौघे ताब्यात

Satara: साडी, मेकअप करून स्वच्छतागृहात ठेवला महिलेचा पुतळा; एका महिलेसह चौघे ताब्यात

सातारा : येथील रविवार पेठेतील महिलांच्या स्वच्छतागृहात महिलेला साडी नेसवून, मेकअप करून पुतळा ठेवणाऱ्या चार जणांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने ताब्यात घेतले. एका महिलेसह अल्पवयीन मुलाचाही त्यामध्ये समावेश आहे.

रोहित संजय धनगेकर (वय २६), सनी तानाजी माने (१९, रा. रविवार पेठ, सातारा) यांच्यासह एक महिला आणि अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार पेठेतील लोणार गल्लीमध्ये असलेल्या महिलांच्या स्वच्छतागृहात दि. २४ रोजी रात्री महिलेला साडी नेसवून पुतळा ठेवण्यात आला. त्यावेळी परिसरात लाईट गेली होती. दोन महिला स्वच्छतागृहात गेल्या असता पुतळा पाहून त्या घाबरून गेल्या. या प्रकाराची महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी हा खोडसाळपणा करणाऱ्यांना तातडीने शोधून कारवाई करावी, अशा सूचना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गुन्हे प्रकटीकरणचे पथक तयार करून शोधासाठी पाठवले. या पथकाने गोपनीय माहिती काढून एका युवकास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चाैकशी केल्यानंतर इतरांची नावे पुढे आली. पोलिसांनी तत्काळ इतर तिघांना ताब्यात घेतले. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे प्रकटीकरणचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, संतोष कचरे, गणेश घाडगे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, सुशांत कदम यांनी या कारवाईत भाग घेतला.

महिलांना घाबरविण्यासाठी कृत्य

कचऱ्याच्या कुंडीत महिलेचा पुतळा सापडल्यानंतर संबंधितांनी पुतळा घरी आणला. स्वच्छतागृहात जाणाऱ्या महिलांना घाबरविण्यासाठी संबंधितांनी तेथे महिलेचा पुतळा ठेवण्याचे ठरवले. एका महिलेने पुतळ्याला साडी नेसली. मेकअप केल्यानंतर पुतळा स्वच्छतागृहात त्यांनी ठेवून दिला. महिलांची कशी घाबरगुंडी उडतेय, हे ते पाहत होते, असे पोलिसांच्या तपासात समोर आले.

Web Title: Statue of woman in sari, make-up placed in toilet in Satara; Four arrested including a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.