दुष्काळामुळे पाण्यासाठी आता जागते रहो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:58 AM2019-05-10T11:58:38+5:302019-05-10T11:59:51+5:30
आतापर्यंत चोरांच्या भीतीने गावांमध्ये ह्यजागते रहोह्णची आरोळी दिली जायची. हे आपण पाहिले आणि ऐकलेही; पण आता दुष्काळामुळे माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील ग्रामस्थ टेंभू योजनेतून महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सुटलेल्या व्हॉल्व्हजवळ तो दुसरीकडे पूर्ण फिरवितील म्हणून दिवस-रात्र मुक्काम ठोकून आहेत. त्यामुळेच हे पाणी आता तलावाच्या दिशेने येऊ लागलेय.
नितीन काळेल
सातारा : आतापर्यंत चोरांच्या भीतीने गावांमध्ये जागते रहोची आरोळी दिली जायची. हे आपण पाहिले आणि ऐकलेही; पण आता दुष्काळामुळे माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील ग्रामस्थ टेंभू योजनेतून महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सुटलेल्या व्हॉल्व्हजवळ तो दुसरीकडे पूर्ण फिरवितील म्हणून दिवस-रात्र मुक्काम ठोकून आहेत. त्यामुळेच हे पाणी आता तलावाच्या दिशेने येऊ लागलेय.
दुष्काळात भरडणाऱ्या माण तालुक्याच्या वरकुटे मलवडी परिसरातील १६ गावांत पाण्याचं मोठं दुर्भिक्ष; पण आता टेंभू योजनेतून प्रथमच आलेलं पाणी दुष्काळग्रस्तांची तहान भागवणार आहे. सांगली जिल्ह्यातील झरे (ता. आटपाडी) येथे असणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून सुटलेलं हे पाणी माळरान, ओढ्यातून खळाळत महाबळेश्वरवाडी तलावाच्या दिशेने प्रथमच निघालंय. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा उत्साह आणि आनंद गगनात मावेनासा झालाय. प्रत्येकालाच हे पाणी कधी एकदा गावच्या ओढ्यातून वाहत बंधारे भरून तलावात पोहोचतंय, असं झालंय; पण यालाही काही ठिकाणी अडसर येण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
झरे जवळच्याच टेंभू योजनेच्या व्हॉल्व्हमधून आटपाडी तालुक्यातील दिघंची (जि. सांगली) गावाला पाणी जात आहे. मात्र, संबंधित गावाला जाणाºया योजनेच्या जलवाहिनीचे काम थोडेच झाले आहे. असे असलेतरी त्या गावाला पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतो. त्यासाठी शेनवडीमार्गे ओढे, तलावातून संबंधित गावच्या हद्दीत पाणी नेण्याचा लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हे अंतर खूप असल्याने संबंधित गावच्या तलावात पाणी पोहोचण्यास वेळ लागणार आहे. त्यातच माण तालुक्यातील १६ गावांतूनही पिण्याच्या पाण्यासाठी मागणी होती. त्यामुळे जलवाहिनीचे काम झाल्याने महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सोडले.
सध्या दोन्हीकडे पाणी सुरू आहे. त्यामुळे पुरेशा दाबाने पाणी दोन्हीकडे जात नाही. यासाठी दिघंचीचे ग्रामस्थ व्हॉल्व्ह फिरवून जादा पाणी घेऊन जातील, या भीतीने महाबळेश्वरवाडी, कोरेवाडी, काळचौंडीचे ग्रामस्थ व्हॉल्व्हजवळ दिवसा तसेच रात्रीही मुक्काम ठोकून आहेत. कारण, यापूर्वी दिघंचीच्या ग्रामस्थांनी व्हॉल्व्हजवळ मुक्काम ठोकला होता. आता काहीही करून लवकर पाणी महाबळेश्वरवाडी तलावात कसे पोहोचेल, असाच वरकुटे परिसरातील ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. दोन दिवसात प्रत्यक्षात पाणी तळ्यात पोहोचणार आहे.