प्लास्टरच्या मूर्तींना अटकाव करा
By admin | Published: July 5, 2014 12:42 AM2014-07-05T00:42:12+5:302014-07-05T00:46:28+5:30
शिवसेनेची मागणी : राजस्थानी कलावंतांना शाडूमूर्ती बनविण्याची विनंती
सातारा : तलाव, नद्या, विहिरींचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरात येणाऱ्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना प्रशासनाने अटकाव करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यासंदर्भातील निवेदन सादर केले. महामार्गाजवळ प्लास्टरच्या मूर्तींची विक्री करणाऱ्या राजस्थानी मूर्तिकारांशी चर्चा करून शाडूमातीच्या मूर्ती तयार कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली.
शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर पंडित, माजी उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, उपतालुकाप्रमुख आतिश ननावरे, रमेश बोराटे, प्रवीण शहाणे, निमिष शहा, श्रीनिवास जाधव, हरिदास मोरे, ज्ञानेश्वर साबळे, शेखर कदम, गोपीनाथ यादव, हेमंत उबाळे, नंदकुमार केसरकर, बाळासाहेब शिंदे आदी कार्यकर्त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांची गुरुवारी सकाळी भेट घेतली. ‘शाडूची मूर्ती महाग असल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच रंगकामासाठी घातक रसायने वापरली जातात. त्यामुळे जलप्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. प्लास्टरच्या मूर्ती तळ्यांमध्ये विसर्जित करण्यास बंदी घालण्याचे ठरविण्यात आले आहे. शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे,’ असे या निवेदनात म्हटले आहे.
‘सातारच्या बाँबे रेस्टॉरंट चौकात राजस्थानी मूर्तिकार दरवर्षी प्लास्टरच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणावर विक्री करतात. या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना प्लास्टरच्या मूर्ती न बनविण्याबद्दल विनंती करणार आहोत. प्रशासनानेही याकामी पुढाकार घ्यावा आणि अशा मूर्तींच्या खरेदी-विक्रीला प्रतिबंधासाठी कायदेशीर व प्रबोधनात्मक पावले उचलावीत,’ अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन दिल्यानंतर कार्यकर्ते कृष्णानगर परिसरातील राजस्थानी मूर्तिकारांच्या वस्तीत गेले. यावर्षी शाडूमातीच्याच मूर्ती कराव्यात, असा आग्रह धरला. परंतु, ‘आमच्या मूर्तींचे प्लास्टर वेगळे असून, ते पाण्यात विरघळते,’ असे म्हणत मूर्तिकारांनी यंदाच्या वर्षी अशा मूर्ती करू देण्याची विनंती केली. ‘नियमच केला, तर पुढील वर्षापासून आम्ही मातीच्या मूर्ती करू,’ असे सांगतानाच मातीच्या मूर्ती तयार करण्याइतका वेळ आता शिल्लक नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कार्यकर्त्यांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींना विरोध कायम ठेवला. ‘नियमच होणार असेल, तर आम्ही पुढील वर्षी मातीच्याच मूर्ती करू,’ असे मूर्तिकारांनी ‘लोकमत’ला सांगितले. (लोकमत टीम)