लसच उपाय; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:35 AM2021-04-26T04:35:44+5:302021-04-26T04:35:44+5:30
सातारा: जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही तितकेच पटींनी वाढत आहे. याचे मुख्य ...
सातारा: जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही तितकेच पटींनी वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लसीकरण झालेले रुग्ण कोरोनातून सहीसलामत बाहेर येत आहेत. लसीकरणानंतर एकाही व्यक्तीचा जिल्ह्यात मृत्यू झाला नसल्याचे समोर आले असून ही बाब आरोग्य विभागासाठी मोठी सकारात्मक ठरली आहे.
जिल्ह्यात लसीकरणाला एक मार्चला प्रारंभ झाला. तेव्हा पहिल्या टप्प्यात जवळपास तीन लाख लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर २८ दिवसानंतर या लोकांनी पुन्हा दुसरा डोस घेतला. यादरम्यान लस घेऊनही जिल्ह्यात एकूण २२ जण कोरोना बाधित आढळून आले. मात्र या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती अत्यंत उत्तम राहिली. त्यामुळे त्यांना कोरोना बाधित काळामध्ये कोणताही त्रास जाणवला नाही. एवढेच नव्हे तर त्यांना रुग्णालयातही दाखल करण्याची गरज भासली नाही. घरच्या घरीच त्यांच्यावर औषधोपचार केला गेला. यातून हे सर्व रुग्ण सुखरूप बाहेर पडले. या लोकांचा जीव वाचवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरले. यामुळे एकाही व्यक्तीचा बळी गेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहेच. शिवाय आरोग्य विभागाने दोन महिन्यांपासून घेतलेले परिश्रमही फळाला आले.
लसीकरणाचा वेग जिल्ह्यात सध्या मंदावला आहे कारण लसीचा तुटवडा वारंवार होत आहे. खरंतर ही कोरोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी आता लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. हे शासनालाही पटले आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून लसीचे डोस उपलब्ध होत नसल्यामुळे ही मोहीम दोन वेळा थांबवावी लागली.
चौकट :
पहिल्या डोस नंतर जिल्ह्यात केवळ एक टक्का पॉझिटिव्ह
जिल्ह्यात लसीकरणामुळे अनेकजण कोरोनापासून बचावले. विशेष म्हणजे केवळ एक टक्काच लोकांना लसीकरणानंतर कोरोनाची बाधा झाली. मात्र त्यांना फारसा त्रास झाला नाही. अगोदर लस घेतल्यामुळे हे लोक मनानेही खंबीर झाले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात जाण्याची गरज भासली नाही. सुरूवातीला अनेक जणांनी लस घेण्यासाठी टाळाटाळ केली. मात्र कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढल्यानंतर लोकांनी पुन्हा लसीकरण केंद्रावर गर्दी केली.
चौकट: लस महत्त्वाचीच, मृत्यूचा धोका कमी होतो
सुरुवातीच्या काळामध्ये लसीबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होती. त्यामुळे लोक लस घेताना मागेपुढे पाहत होते. परंतु जसे लसीचे महत्व लोकांना समजलं. तशी लोक लस घेण्यासाठी पुढे येऊ लागली. कोरोनाच्या लाटा अजून किती येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे यावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण हाच असल्याचे आरोग्य विभागही ठामपणे सांगत आहे.
चौकट: दोन्ही डोस घेतल्यानंतर जिल्ह्यात एक टक्का पॉझिटिव्ह
कोरोना बाधितांची संख्या सध्या झपाट्याने वाढत असली तरी यामध्ये ज्यांनी लस घेतली नाही त्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत असे लोक केवळ एक टक्काच बाधित आढळून येत आहेत.
कोट ः
मी दोन्ही लसीचे डोस घेतले होते. मात्र मी कोरोना बाधित आलो. परंतु मला कसलाही त्रास झाला नाही. ना रुग्णालयात जावे लागले ना कसली चिंता करावी लागली. हे केवळ लसीकरणामुळे शक्य झाले.
अनिकेत जाधव, सातारा