दहावी परीक्षा शुल्क मिळण्याबाबत अजूनही संभ्रमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:39 AM2021-05-18T04:39:44+5:302021-05-18T04:39:44+5:30
सातारा : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता परीक्षाच नाही, तर शुल्क परत करा, असा सूर पालकांमध्ये उमटू लागला आहे. ...
सातारा : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता परीक्षाच नाही, तर शुल्क परत करा, असा सूर पालकांमध्ये उमटू लागला आहे. जिल्ह्यात ४४ हजार ७१६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार होते. त्यांच्या परीक्षा शुल्कापोटी ४१५ रुपये आकारण्यात आले आहेत. परीक्षा शुल्कापोटी शासनाकडे तब्बल १ कोटी ८५ लाख ५७ हजार १४० रुपये जमा आहेत. मात्र, परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याने आवश्यक यंत्रणांद्वारे ही रक्कम खर्ची पडल्याचेही सांगण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावीच्या परीक्षा ऐन वेळी रद्द करण्यात आल्या. मात्र, परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, केंद्र ठरवणे, या सर्वांचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षा केंद्रांवर या सर्व वस्तूही वेळेच्या आधी पोहोचविण्यात आल्या होत्या. मात्र, कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना त्याची बाधा होऊ शकते, असे गृहित धरून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पालक परीक्षा शुल्क परत द्यायची मागणी करत आहेत, तर परीक्षा झाली नसली, तरीही यंत्रणा तर पूर्ण राबली, असं शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
शुल्क परत करण्याचा निर्णय शासनाने घेतलाच, तर दहा रुपये बोर्ड सर्टिफिकेट आणि दहा रुपये मार्कलिस्टचे घ्यावेच लागतील, असं सांगण्यात येत आहे. कोरोनामुळे आर्थिक अवस्था बिकट झाल्याने, मिळालेली ही शुल्काची रक्कम मोबाइल रिचार्ज करून घेण्यासाठी उपयोगी ठरेल, असा विचार पालक करत आहेत, तर विद्यार्थ्यांना शुल्क परत करायचं म्हटलं, तर पालकांकडे करावे की शाळेतच करावे, असा प्रश्न समोर आहे. शाळांना परीक्षा शुल्क परत केले आणि त्याचे वाटप शाळांनीच पालकांनी नाही केले तर काय? असाही प्रश्न समोर उभा आहे.
पॉइंटर :
१,१४२
जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा
४४,७१६
दहावीतील एकूण विद्यार्थी
४१५
प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क
१ कोटी ८५ लाख ५७ हजार १४०
परीक्षा शुल्काची एकूण रक्कम
कोट :
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र, त्यापूर्वी शिक्षण विभागाने परीक्षेची सर्वच तयारी पूर्ण केली होती. परीक्षा शुल्क परत करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. तशा सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येईल.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी
विद्यार्थी प्रतिक्रिया
दहावीची परीक्षा रद्द केली असली, तरीही गुणांकांना किंवा अकरावी प्रवेशाबाबत काहीच जाहीर केलेले नाही. परीक्षा नसल्याने आम्हाला कशाच्या आधारावर गुण देणार आणि त्यामुळे आमच्या आवडीच्या शाखेत प्रवेश घेता येईल, या सर्वच बाबत गोंधळ आहे.
- तन्वीर चित्रा अजित, विद्यार्थी
दहावीचं वर्ष म्हटल्यावर मी अगदी मन लावून अभ्यास केला होता. भविष्यातील करिअरचा पाया दहावी असल्याने खुप कष्ट घेतले. पण परीक्षा रद्द झाल्याने हिरमुस झाला. करिअरची पुढची दिशा कशी ठरवली जाणार, मूल्यांकन कसं होणार, याबाबत स्पष्टता मिळावी.
- स्नेहा पाटसुते, विद्यार्थी
पुढचं शिक्षण कसं होणार, आम्ही अभ्यास कसा करणार, कोरोना असंच राहिला, तर त्याचा आमच्या करिअरवर विपरित परिणाम होणार आहे. अकरावी प्रवेशाला सीईटी घेण्याच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. असं करणार असतील, तर विद्यार्थ्यांना त्याची तयारी करायला वेळ देणं आवश्यक आहे.
- वरुण पवार, विद्यार्थी