मटका अड्ड्यावर हप्ता घेणाऱ्या पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 04:32 PM2018-08-04T16:32:23+5:302018-08-04T18:40:20+5:30
'अर्थ'पूर्ण संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सातारा : मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेल्या तीन पोलिसांची व्हिडीओ क्लिप बनवून एका नागरिकानं पोलीस यंत्रणेचा भांडाफोड केला आहे. या स्टिंग ऑपरेशन’मध्ये ‘साहेबांना आता तीन हजार दिले आहेत. उरलेले तीन हजार संध्याकाळी देतो,’ असं संभाषण पाहायला आणि ऐकायला येत आहे. विशेष म्हणजे, कोणालाही अटक न करता पोलीस मटक्याच्या अड्ड्यावरुन बाहेर पडतानाही दिसत आहेत.
दोन दिवसांपूर्वी राजवाडा परिसरातील एका मटका अड्ड्यावर तीन पोलीस छापा टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका व्यक्तीनेआपल्या मोबाईलवर त्यांचे चित्रीकरण केले. आतमध्ये दोन पोलीस गेले होते. तर बाहेर एका पोलिसासोबत चर्चा सुरू होती.‘कितीही केले, तरी मटका अड्डे सुरूच राहणार, आता फक्त एकच सुरू आहे,’ असं हा पोलीस म्हणतो आहे. इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्यानंतर तो पोलीस कर्मचारी आतमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्याकडे जातो. त्याच्या पाठोपाठ चित्रीकरण करणारी व्यक्तीही जाते. त्यावेळी आतमध्ये सुरू असलेले संभाषण ऐकायला येते. ‘पाचला पन्नास..’ त्यानंतर मध्येच एकजण बोलतो, ‘अजून साहेबांचे पैसे दिले नाहीत. जे आता तीन हजार दिले आहेत; पण उरलेले तीन हजार संध्याकाळी देतो,’ या संभाषणानंतर एक पोलीस कर्मचारी एका व्यक्तीला ‘बाहेर ये’ असे सांगतो.
या चित्रफितीत मटका घेणारे आणि खेळणारेही दिसतात. भिंतीवर चिठ्ठ्या अडकवलेल्या दिसतात. मात्र, या मटक्याच्या साहित्याकडे डोळेझाक करून तिन्हीही पोलीस बोलत-बोलत बाहेर येतात. ‘फार चिंगुस आहेत,’असा शेराही त्यावेळी एक व्यक्ती पोलिसांकडे पाहून मारते. दोन पोलीस चालत दुसरीकडे जातात, तर एक पोलीस गाडीवर बसून मोबाईलवर बोलत-बोलत निघून जातो.