दारूच्या दरवाढीचं मद्यपीनंच केलं स्टिंग ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:49+5:302021-07-02T04:26:49+5:30
सातारा : नेहमी दारूच्या गुत्त्यावर असलेल्या मद्यपीला अचानक देशी दारूचे दर वाढल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी त्याने जाऊन पाहणी ...
सातारा : नेहमी दारूच्या गुत्त्यावर असलेल्या मद्यपीला अचानक देशी दारूचे दर वाढल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी त्याने जाऊन पाहणी केली असता पूर्वीसारखेच दर आहेत, मात्र काही ठराविक ठिकाणीच मनमानी दारूची विक्री होत असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर मद्यपीने चक्क स्टिंग आॅपरेशन केलं. या स्टिंगमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. दारूच्या बाटलीवर बनावट किमतीचे शिक्के मारून दारू चढ्या दराने विकली जात असल्याचे समोर आले.
सातारा शहरामध्ये लाॅकडाऊन कालावधीत वाटेल त्या दराने व्यावसायिकांनी दारूची विक्री केली. बाहेर दुकानाचे शटर बंद पण मागच्या दरवाजाने दारूची विक्री केली जात होती. नेहमीपेक्षा जास्त दराने दारूची विक्री झाल्याने हे लाॅकडाऊन दारूच्या व्यावसायिकांच्या पथ्यावर पडले. हीच सवय आता काही व्यावसायिकांना लागली आहे. ५० रुपयांची दारू ६० रुपयांना अद्यापही विकली जात आहे. एक मद्यपी नेहमीप्रमाणे दारू दुकानात गेल्यानंतर त्याला दारूचे दर अचानक वाढलेले दिसले. त्याने याचा जाब विचारलासुद्धा. मात्र, त्याला थातुरमातुर उत्तरे देऊन दारू दुकनदारांनी पिटाळून लावले. दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या मोबाइलमध्ये दारूदराचे स्टिंग आॅपरशेन केले. दुकानातून दारूची बाटली विकत घेताना त्याला जादा पैसे दिले. शिवाय बेकायदा दारूच्या बाटलीवर मारलेल्या शिक्क्याचेही त्याने फोटो काढले. यानंतर याचा व्हिडीओ त्याने उत्पादनशुल्कच्या अधिकाऱ्यांना दिला.
काही दारू विक्रेत्यांच्या मनमानीचा पर्दाफाश एका मद्यपीनेच केल्याने उत्पादन शुल्कचे अधिकारीही अवाक झाले. तो स्टिंग आॅपरेशन केलेला व्हिडीओ साताऱ्यातील नेमका कोणत्या दुकानातील आहे, याची माहिती आता उत्पादन शुल्कचे अधिकारी घेत आहेत. शहानिशा करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
चाैकट
अन् चर्चेचे ठरले...
यापूर्वी अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टिंग आॅपरेशन केले आहे. मात्र, एका मद्यपीनं केलेलं हे पहिलेच स्टिंग आॅपरेशन आहे. पुराव्यासहित त्याने दारू विक्रेत्यांचा भंडाफोड केला आहे. त्यामुळे हे स्टिंग आॅपरेशन साताऱ्यात विशेष चर्चेचे ठरले आहे.