कोयना धरणात ९० टीएमसीवर साठा; महाबळेश्वरला १५४ मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:41 AM2021-07-27T04:41:00+5:302021-07-27T04:41:00+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर एकदम कमी झाला असून, सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत कोयनेला ७७, नवजा ८३ ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर एकदम कमी झाला असून, सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत कोयनेला ७७, नवजा ८३ आणि महाबळेश्वरला १५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील साठा ९०.१४ टीएमसीवर पोहोचला होता तर धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर स्थिर असून, त्यामधून ३०,६४९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता.
जिल्ह्यात मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला. पूर्व भागापेक्षा पश्चिमेकडे पावसाचा जोर अधिक होता. कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर या भागात तर बुधवारपासून धुवाँधार पाऊस कोसळत होता. यामुळे नदी, नाले एक झाले. कृष्णा, वेण्णा, कोयनासह पश्चिम भागातील अन्य नद्यांना महापूर आला. त्याचबरोबर कोयना, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम, बलकवडी या प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाणी वाढण्याचा विक्रम झाला.
सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंतच्या २३ तासांत कोयना येथे ७७ तर १ जूनपासून २,८५६ मिलिमीटर पाऊस झाला. नवजाला सकाळपर्यंत ८३ व यावर्षी आतापर्यंत ३,६९८ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. महाबळेश्वरला १५४ आणि जून महिन्यापासून ३,६७७ मिलिमीटर पाऊस झाला. सकाळी सातच्या सुमारास कोयना धरणात ३२,७४९ क्युसेक पाण्याची आवक होत होती तर धरणात ९०.१४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्याचबरोबर तीन दिवसांपासून धरणाचे सहा दरवाजे साडेपाच फुटांवर स्थिर आहेत. दरवाजातून ३०,६४९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. कोयनेतून सर्व मिळून ३२,७४९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. हे सर्व पाणी कोयना नदीत जात आहे. यामुळे कोयनेला पूर कायम आहे.
.......
चौकट :
प्रमुख धरणांतील विसर्ग (सकाळी आठची आकडेवारी)
धोम धरणातून ५,५७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता तर कण्हेर ५,३२९ क्युसेक, कोयना ३२,७४९, उरमोडीतून १,५५१, बलकवडी १,२९२ आणि तारळी धरणातून ४,५१२ क्युसेक पाणी सोडले जात होते. दरम्यान, धोम धरण ७६ टक्के भरले आहे तर कण्हेर ७५.६३, कोयना ८४.९२, उरमोडी ७१.९६, बलकवडी ८४.०५ आणि तारळी धरणात ८६.६५ टक्के पाणीसाठा झाला आहे.
........................................