चोरीस गेलेली कार इंदोरमध्ये सापडली-- अवघ्या चोवीस तासांत एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:14 AM2019-06-06T01:14:12+5:302019-06-06T01:14:38+5:30
कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन नवी कार चोरून नेणाऱ्या चोरट्यांना अवघ्या चोवीस तासांतच कारसह पकडण्यास बोरगाव पोलिसांच्या टीमला
नागठाणे : कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन नवी कार चोरून नेणाऱ्या चोरट्यांना अवघ्या चोवीस तासांतच कारसह पकडण्यास बोरगाव पोलिसांच्या टीमला यश आले.
मनिषकुमार बदनसिंग मलीक (वय २४ वर्षे, रा. जाकोली, ता. जि. काथन, राज्य हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गावातील दोन साथीदारांच्या मदतीने कारची चोरी केल्याचे कबुली दिली. त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कंटेनर चालक राजेश चौहान (वय ३८, रा. जैतवार सोना, सुजनीपूर, जि. गांजीपूर उत्तरप्रदेश) हा फलटणहून सांगलीकडे कंटेनरमधून नवीन कार घेऊन जात होता. बुधवार, दि. २९ रोजी रात्री आदर्की फाटा येथील हॉटेलवर चौहान जेवण करण्यासाठी थांबला होता. त्यावेळी तेथे अन्य तिघेजण आले. त्यांनी दारूमधून चौहान यांना गुंगीचे औषध दिले. जेवण झाल्यानंतर चौहान हा कंटेनर घेऊन आदर्कीहून वाढे फाट्यामार्गे सांगलीकडे निघाला. बोरगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत पोहोचल्यानंतर चौहान याला झोप अनावर झाली. त्यामुळे कंटेनर रस्त्याच्याकडेला उभा करून तो कंटेनरमध्येच झोपी गेला. सकाळी दहा वाजता त्याला जाग आल्यानंतर कंटेनरमध्ये आठ लाखांची नवी कोरी कार नसल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर त्याने बोरगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
बोरगाव पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन मोबाईल लोकेशनवरून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी संबंधित आरोपी इंदोर, मध्यप्रदेश येथे असल्याचे समजले. त्यानुसार तेथील पोलिसांना याची कल्पना देण्यात आली. इंदोर पोलिसांनीही वेळ न दवडता बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी मनिषकुमारच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला अवघ्या चोवीस तासांत अटक करून इंदोर पोलीस आरोपीसह बोरगाव पोलीस ठाण्यात आले. आरोपीला बोरगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर ते इंदोरला निघून गेले.या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, प्रकाश राठोड, चंद्रकांत कुंभार, चेतन बगाडे, स्वप्नील माने आदींनी भाग घेतला.
चोरीची कार इंदोर पोलिसांनी बोरगाव पोलिसांच्या ताब्यात दिली.