चोरीला गेलेले शेततळे पुन्हा अवतरणार?

By admin | Published: May 7, 2016 12:02 AM2016-05-07T00:02:15+5:302016-05-07T00:52:05+5:30

चांदकमधील गोलमाल : प्रकरण दडपणाऱ्यांचे धाबे दणाणले--बातमीनंतरची बातमी

The stolen farmland again? | चोरीला गेलेले शेततळे पुन्हा अवतरणार?

चोरीला गेलेले शेततळे पुन्हा अवतरणार?

Next

भुर्इंज : चांदक, ता. वाई येथे शेततळे न खोदताच लाखांची रक्कम हडप करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणात सहभागी असणारी साखळी हादरली असून, हे प्रकरण उघडकीस आल्याने त्यांची धावपळ उडाली आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी संबंधित जागेवर शेततळे खोदण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.मुळातच शेततळे खुदाईची वर्क आॅर्डर दिल्यानंतर कामाची वेळोवेळी पाहणी करून त्या कामाच्या पूर्ततेनुसार रक्कम अदा करण्याचा नियम आहे. चांदक येथील विश्वास भिलारे यांच्या शेतात कागदोपत्री शेततळे खोदल्याचे दाखवून दीड लाखाहून अधिक रक्कम अशाच प्रकारे खर्ची टाकण्यात आली आहे. कृषी विभागाच्या दप्तरी हे शेततळे असले तरी प्रत्यक्षात ज्या भिलारे यांना शेततळे मंजूर केले होते ते प्रत्यक्षात मात्र नाही. शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि त्याची पाहणी करूनच कृषी विभागाने सर्व अनुदान देणे बंधनकारक आहे. मात्र येथे भलतेच घडले असून, भिलारे यांच्या शेततळे कामावर दाखवलेली मजूर यादीही बोगस असल्याचे दिसून येत आहे. कारवाई होण्याची भीती निर्माण झाल्याने भिलारे यांच्या शेतात गुपचूपपणे शेततळे खोदण्यासाठी संबंधितांची धडपड सुरू आहे. मात्र संबंधित गट नंबरमध्ये ऐनवेळी शेततळे खोदून ते आधीच खोदले असल्याचा बनाव ग्रामस्थांनी उघडकीस आणत पुराव्यानिशी तक्रार केली आहे.
या प्रकरणातील शासनाची पैन् पै वसूल करून दोषींवर कारवाई करू, अशी ग्वाही कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी चांदक ग्रामस्थांना दिली आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, याची काटेकोरपणे चौकशी केली जाईल, असे देशमुख यांनी चांदक ग्रामस्थांना सांगितले. चांदक येथील विश्वास भिलारे यांच्या शेतातील गट नं. ९५४ ची पाहणी व पंचनामा करून आयुक्तांना अहवाल सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईनकर यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: The stolen farmland again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.