चोरलेले दागिने रावसाहेब जाधवला दिल्याचे उघडकीस
By admin | Published: January 11, 2017 11:29 PM2017-01-11T23:29:28+5:302017-01-11T23:29:28+5:30
संशयिताची कबुली : सत्तर लाखांच्या चोरीप्रकरणी एकास अटक
कऱ्हाड : करमाळा येथील रावसाहेब जाधवला ज्या सत्तर लाखांच्या चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्याच गुन्ह्यात मंगळवारी रात्री कऱ्हाड शहर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याने या चोरीची कबुली दिली असून, चोरलेले दागिने त्यावेळी मी रावसाहेब जाधवला दिले होते, असेही त्याने तपासादरम्यान सांगितले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.
मारुती राजाराम पिटेकर (वय ४५, रा. म्हाळुंगी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला बुधवारी येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला दि. १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ मे २०१६ रोजी सिमोगा ते मुंबईदरम्यान एक व्यापारी एसटीने प्रवास करीत असताना त्यांची बॅग चोरीस गेली होती. त्यामध्ये सुमारे ७५ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व २ लाख रुपये रोख असा ऐवज होता. कऱ्हाड शहर पोलिसांत याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या चोरीप्रकरणी करमाळा येथील संशयित रावसाहेब जाधव याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान रावसाहेब जाधवचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत रावसाहेबचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी त्यावेळी मोर्चाही निघाला. अखेर शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस यांच्यासह बारा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तत्पूर्वी त्यांना निलंबितही करण्यात आले.
दरम्यान, या चोरीप्रकरणी मारुती पिटेकर याला मंगळवारी रात्री करमाळा तालुक्यातून शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ताब्यात घेतले. त्याला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दि. १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, प्रवासादरम्यान व्यापाऱ्याची बॅग चोरल्याची कबुली संशयित मारुती पिटेकर याने दिली आहे. तसेच चोरीचे दागिने रावसाहेब जाधवला विकले होते, असेही त्याने पोलिसांना सांगितले