पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:43 AM2021-09-22T04:43:16+5:302021-09-22T04:43:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जन्मलेला प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सरकारला टॅक्स देत असतो. प्रत्येकाला ही जाणीव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जन्मलेला प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सरकारला टॅक्स देत असतो. प्रत्येकाला ही जाणीव आहे का? याबाबतचा रिॲलिटी चेक ‘लोकमत’ने केला. अनेक जणांना हा टॅक्स कसा घेतला जातो, याची माहिती नाही, तर काही जण सजगपणे याच्या नोंदी ठेवताना पाहायला मिळतात.
जन्माला आलेल्या बाळापासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच औषधे, खाण्यापिण्याच्या वस्तू, कपडे, वीज लागते. या प्रत्येकाला या उपाययोजना करत असताना टॅक्स भरावा लागतो. प्रत्येक वस्तू आता जीएसटीखाली आलेली आहे. साधी जाहिरात करायची म्हटली तरी ५ टक्के टॅक्स भरावा लागतो, तर कंपनीमध्ये बनवलेली वस्तू बाजारात विकण्यासाठी न्यायची म्हटली तरी तब्बल १८ टक्के टॅक्स लागतो. यामध्ये केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांना हिस्सा मिळतो. उत्पादकाकडून टॅक्स घेतला जातो, तसाच ती वस्तू खरेदी करणाऱ्यांकडूनही टॅक्स घेतला जातो.
१) आपण टॅक्स भरता का?
कामगार : आम्हाला जो पगार मिळतो, त्यातील काही पैसे टॅक्सला जातात.
ऑटो चालक : रिक्षा पेट्रोलवर चालते, पेट्रोलवर टॅक्स आकारला जातो, तो आमच्या खिशातूनच जातो.
भाजीपाला विक्रेता : रस्त्यावर भाजी विक्री करायची म्हटली तरी बाजार समिती किंवा नगरपालिकेची पावती करावी लागते.
फेरीवाला : पोट भरताना मारामार होते, आमच्याकडून टॅक्स घेतला जात नसावा.
सिक्युरिटी गार्ड : गेल्या पंधरा वर्षांपासून काम करतोय. गेल्या दोन वर्षांत थोडाही पगार वाढला नाही. बहुतेक टॅक्स वाढलाय.
साफसफाई कामगार
सलून चालक : सलूनसाठी ज्या वस्तू लागतात, त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. प्रत्येक वस्तूवर जीएसटी लागतो.
लॉण्ड्री चालक : व्यवसाय कमी अन् खर्च जास्त, अशी स्थिती आहे.
घरकाम करणाऱ्या महिला : धुणी-भांडी करण्यासाठी रोज चार घरे फिरावे लागतात. त्याला कसला आलाय टॅक्स!
२) प्रत्येक जण टॅक्स भरतो
जन्माला आलेला प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कारणाने टॅक्स भरत असतो. प्रत्येक वस्तूला टॅक्स लागतो. अगदी ५ टक्क्यांपासून १८ टक्क्यांपर्यंत जीएसटी टॅक्स आहे. टॅक्स भरणारी ही सर्वसामान्य जनताच आहे. त्यामुळे या जनतेला चांगल्या सुविधा मिळणे गरजेचे आहे.
-रवींद्र झुटिंग, चेअरमन, अश्वमेध पतसंस्था, सातारा