साताऱ्यातील खड्ड्यांना दगडांची मलमपट्टी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 04:45 PM2020-08-20T16:45:48+5:302020-08-20T16:49:03+5:30
सातारा पालिकेकडून शहरातील खड्डे खडी व मुरूम टाकून मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. भर पावसात हे काम सुरू करण्यात आले असून, खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या सातारकरांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.
सातारा : सातारा पालिकेकडून शहरातील खड्डे खडी व मुरूम टाकून मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. भर पावसात हे काम सुरू करण्यात आले असून, खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या सातारकरांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.
सातारा शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांची व्याप्ती वाढत चालली असून, खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शहरातील पोवई नाका ते आरटी कार्यालय, शाहू चौक, राधिका रोड, मार्केट यार्ड, खंडोबाचा माळ, समर्थ मंदिर चौक, बुधवार नाका, मोळाचा ओढा या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
या समस्येबाबत लोकमतमध्ये साताऱ्यातील वाहनधारकांची वाट बिकट या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत पालिकेने बुधवारपासून खड्डेमय रस्त्यांच्या डागडुजीचे काम हाती घेतले. पोवई नाका व समर्थ मंदिर या मार्गावरील खड्डे खडी व मुरूम टाकून ताातडीने मुजविण्यात आले.
रस्त्यांची तात्पुरती का होईना मलमपट्टी केल्याने वाहनधारकांना थोडा दिलासा मिळाला. खंडोबाचा माळ व राधिका रस्त्यावरील खड्डेही तातडीने मुजवावेत अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे.