राष्ट्रवादी कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:41 AM2021-05-07T04:41:34+5:302021-05-07T04:41:34+5:30
सातारा : राष्ट्रवादीच्या येथील जिल्हा कार्यालयावर अज्ञातांनी गुरुवारी सकाळी दगडफेक केली. या वेळी सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही देण्यात ...
सातारा : राष्ट्रवादीच्या येथील जिल्हा कार्यालयावर अज्ञातांनी गुरुवारी सकाळी दगडफेक केली. या वेळी सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील निवासस्थानावरदेखील अज्ञातांनी शेण फेकले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवरच गुरुवारी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक झाल्याचे समजते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा अधीक्षक, पोलीस अधीक्षक धीरज पाटील पोलीस फौज घेऊन राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले. कार्यालयाला सुरक्षा देण्यात आली. मंत्री देसाई यांच्या निवासस्थानाबाहेरदेखील कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. दगडफेक तसेच शेणफेक करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी धावाधाव सुरू केलेली आहे.
०६शंभूराज देसाईज हाउस
सातारा येथील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर गुरुवारी पोलीस बंदोबस्त वाढविला होता. (छाया : जावेद खान)
०६सातारा-एनसीपी
साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर गुरुवारी अज्ञातांनी दगडफेक केली. यात कार्यालयाच्या काचा फुटल्या आहेत. (छाया : जावेद खान)