भ्रष्टाचार थांबवा; हत्तीला खायला खूप लागते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:18 PM2017-10-04T23:18:41+5:302017-10-04T23:18:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : वसंत लेवे यांनी आमदारांना गांधी मैदानावर वेळ-तारीख देण्याचे खुले आव्हान दिले होते, त्यावेळी नविआतील नगरसेवकांना पुढे केले होते. म्हणजेच त्यावेळी तुम्हीही बिनशर्त माघार घेतली होती. शेतकºयाचा-सभासदांचा घामाचा पैसा लाटून, अन्यायाविरोधात उभे राहण्याचे नाटक करणारे हे आमदार ‘सौ चुहे खा के बिल्ली.. चली’ आहेत. तूर्त तुम्ही तुमच्या संस्थेतील भ्रष्टाचार बंद करा. कारण हत्तीला खायला खूप लागते, असा घणाघाती पलटवार ‘जलमंदिर’हून पाठविण्यात आलेल्या सातारा विकास आघाडीच्या पत्रकात केला गेला आहे.
साविआच्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कल्पनाराजेंनी उत्तर देण्याइतपत आमदारांची उंचीही नाही आणि कर्तृत्वच काहीच नाही. सहकारी संस्था मोडून हडप केल्या नसत्या आणि खरच दिवंगत भाऊसाहेब महाराज यांनी साताºयाचे नंदनवन केले असते तर नगराध्यक्षपदाला कर्तव्यदक्ष वहिनीसाहेबांचा दारुण पराभव झाला नसता.
तुमचे कर्तृत्वच त्याला कारणीभूत असल्याने, दररोज तुमचे मन खात आहे व कायम खात राहणार,
मुळात मुद्दा सोडून कल्पनाराजे किंवा उदयनराजे हे कधीच तुमच्यासारखे भरकटत नाहीत.
घंटागाड्यांच्या प्रश्नाबाबत आमदारांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे का, याची शहानिशा करण्यासाठी कल्पनाराजे नगरपालिकेत दाखल झाल्या. चर्चेचा उहापोह झाल्यावर, घंटागाडी प्रतिनिधींनी तोडपाण्याविषयी आमदारांनी व्यक्त केलेले मत, त्यांचे वैयक्तिक मत असल्याचा खुलासा केला होता.
तुमच्या आमदारांची साप समजून भुई थोपटण्याची सवय जुनी असल्याने, कल्पनाराजेंनी पूर्वी तुम्ही केलेल्या खोट्या आरोपाबाबतची खंत व्यक्त केली होती. तसेच सातारकरांना सक्षम सेवा घंटागाडीवाले देत असतील तर त्यांना एक महिना संधी द्या, असा तोडगा सुचवला होता. यामुळे घंटागाडीवाल्यांचे आंदोलन संपुष्टात आले. इथेच आमदारांच्या नाकाला मिरची झोंबली.
त्यामुळे त्यांनी कल्पनाराजे यांच्यावर बेछूट आरोप करून, मर्यादांचे उल्लंघन केले. त्याला कल्पनाराजेंना उत्तर देणे अशक्य नव्हते. तथापि, चिखलात दगड मारून घाण अंगावर कशाला घ्यायची, या विचाराने त्यांनी उत्तर दिले नाही. उदयनराजेंवर खोटे-नाटे आरोप झाल्यापासूनचे लेवे साक्षीदार आहेत. तसेच ते आरोग्य सभापती असल्यान त्यांनी कल्पनाराजेंवरील आरोप खोडून काढले.
लेवेंच्या उत्तरामुळे आंदोलनाला पाठिंबा देण्याचे नाटक रंगमंचावर येण्यापूर्वीच बारगळल्याने, तुमची नैराश्यावस्था झाली.
लेवे गेली जवळजवळ २० वर्षे तुमच्या सोबत होते. मोनेंबरोबर नविआची खिंड लढवताना, त्यावेळचे लेवे संताजी तर मोने धनाजी ठरले होते.
आज तुमच्यापासून दूर झाल्यावर अचानक त्यांना जनावर म्हणण्यापर्यंत मजल गेली, यामधून व्यक्तींचा वापर करायचा आणि सोडून द्यायचे, अशी नीती तुमची दिसून आली आहे.
संपूर्ण स्वायतता आणि सुमारे २२-२३ वर्षे मंत्री असलेल्या व्यक्तीने ‘अजिंक्य’ या नावाने ज्या काही संस्था स्थापन केल्या. त्याशिवाय दुसरं काहीही केलेले दिसत नाही. दुसरं काहीच केले नाही म्हणून आज सातारा ३०-४० वर्षे मागे पडला असावा, असे सातारकरांना वाटत आहे.
कदाचित तुम्हाला सहकार महर्षी नव्हे तर स्वाहा:कार महर्षी असे काहीसे म्हणायचे असेल. जे काही त्यांनी अजिंक्य म्हणून केले त्यापैकी निम्या संस्था तुम्ही ज्याला हत्ती म्हणता, त्यांनी आज मोडून खाल्या आहेत, ही वस्तुस्थिती सामान्य जनतेला माहिती आहे, अशा शब्दात नविआला या पत्रकात फटकारले आहे.