कोतवालांचे आर्थिक शोषण थांबवा...
By admin | Published: February 22, 2015 10:24 PM2015-02-22T22:24:07+5:302015-02-23T00:22:40+5:30
आजपासून मुंबईत आंदोलन : जिल्ह्यातून सहाशे जण सहभागी होणार
सातारा : राज्यातील कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, त्यांचे मानसिक व आर्थिक शोषण थांबविण्यात यावे या व इतर अनेक मागण्यांसाठी राज्यातील कोतवाल मुंबईतील आझाद मैदानावर दि. २३ पासून धरणे आंदोलन करणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सुमारे सहाशे कोतवाल सहभागी होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात हजारो कोतवाल आहेत. त्यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यामध्ये कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा देण्यात यावा, सेवानिवृत्त व मृत झालेल्या कोतवालांच्या पत्नींना किमान तीन हजार रुपये महिना निर्वाहभत्ता देण्यात यावा, कोतवालांच्या वारसांना रिक्त जागेवर नियुक्त करण्यात यावे, कोतवालांचे मानसिक व आर्थिक शोषण थांबवावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
कोतवालांच्या मागणीसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी आश्वासने मिळाली; पण कोणीही ती पाळली नाहीत. म्हणूनच कोतवालांशी संबंधित सर्व मागण्या मान्य होण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर सोमवार, दि. २३ पासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यातील हजारो कोतवाल सहभागी होणार आहेत, अशी माहिती कोतवाल संघटनेच्या वतीने प्रसिध्दपत्रकाद्वारे देण्यात आली. (प्रतिनिधी)
मानधन आहे, पगार नाही... सुटीदिवशी कामावर
कोतवालांची मुख्य मागणी आहे ती आर्थिक आणि मानसिक शोषण थांबविण्यात यावे. कारण, कोतवालांना सध्या मानधन देण्यात येत आहे. तेही महिना पाच हजार रुपये. त्यांना पगार हवा आहे. त्याचबरोबर मानसिक शोषणानेही ते हैराण आहेत. वरिष्ठ अधिकारी सुटीदिवशी कामावर बोलवतात. रात्रीच्या वेळी काम लावतात. त्यामुळे अशा त्रासातून सुटका व्हावी, अशी कोतवालांची मागणी आहे.