जावलीतील अवैध व्यवसाय थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:34 AM2021-03-14T04:34:40+5:302021-03-14T04:34:40+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील अनेक गावांत दारू, मटका, जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. त्यांच्यावर कायमस्वरुपी कारवाई व्हावी. तसेच अवैध ...
कुडाळ : जावळी तालुक्यातील अनेक गावांत दारू, मटका, जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. त्यांच्यावर कायमस्वरुपी कारवाई व्हावी. तसेच अवैध धंदे चालवणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई व्हावी, अशी मागणी जावळी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती सौरभ शिंदे यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्याकडे केली.
यावेळी कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम, ग्रामपंचायत सदस्य धैर्यशील शिंदे, दिलीप वारागडे, राष्ट्रवादीचे नेते आशिष रासकर उपस्थित होते.
सौरभ शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, जावळी तालुक्यात बारा वर्षांपूर्वी महिलांनी मतदानाद्वारे तालुक्यातील उभी बाटली आडवी केली. तालुका महाराष्ट्रात ऐतिहासिक दारूमुक्त म्हणून घोषित केला. तरीही दहा ते बारा वर्षांपासून तालुक्यात अवैध दारू, मटका, जुगार धंदे राजरोसपणे सुरू आहेत. उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यांच्या जुजबी कारवाईमुळे या अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांना अभय मिळत आहे. पोलीस यंत्रणेनेही याकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. तसेच या धंद्यावर कारवाया होऊनही पुन्हा तेच मालक-चालक वर्षानुवर्षे हाच अवैध धंदा करत आहेत. याचा सर्वसामान्य जनता, महिला, मुले, वृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आठ दिवसांत जावळी तालुक्यातील दारू मटका व जुगार अड्डे कायमस्वरूपी बंद झाले नाहीत, तर जनआंदोलन उभारले जाईल. प्रसंगी कायदा हातात घेऊन अवैध दारू धंदे, मटके व जुगार अड्डे चालक-मालक यांच्या स्वतः मुसक्या आवळून आयुष्याची अद्दल घडवू, असा इशाराही त्यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
चौकट :
‘जावळी तालुक्यातील अवैध दारू मटका जुगार खेळणाऱ्या व चालवणाऱ्या चालक-मालक यांना जेरबंद करू. तसेच त्यांचा योग्य तो बंदोबस्त करून कारवाई केली जाईल,’ असे आश्वासन अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिले.