खासगी रुग्णालयांमधील लाखोंची लूट थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:40 AM2021-05-08T04:40:55+5:302021-05-08T04:40:55+5:30
औंध : ‘कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असल्याने बाधितांना सरकारी हॉस्पिटल्समध्ये बेड आणि ...
औंध : ‘कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असल्याने बाधितांना सरकारी हॉस्पिटल्समध्ये बेड आणि उपचार मिळेनासे झाले आहेत. हीच संधी साधून खासगी हॉस्पिटल्सनी भरमसाट बिले आकारून गोरगरिबांची आर्थिक लूट सुरू केली आहे. अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार सांगूनही, कारवाई केली जात नाही. माण-खटाव तालुक्यांत यापुढे खासगी हॉस्पिटल्सनी नियमबाह्य आणि अवास्तव बिलांची आकारणी केली, तर गाठ माझ्याशी आहे,’ असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला.
आमदार गोरे म्हणाले, सध्या कोरोना उद्रेकामुळे सर्व शासकीय रुग्णालये, कोरोना उपचार केंद्रे, आयसोलेशन कक्ष क्षमतेपेक्षा अधिक भरले आहेत. कोरोनाबाधितांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे. अत्यवस्थ रुग्णांना नाईलाजाने खासगी हॉस्पिटल्सचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, सध्याच्या विदारक परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी खासगी हॉस्पिटल्स मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यात व्यस्त आहेत. गोरगरीब रुग्णांकडून अवाच्या सवा लाखोंची बिले उकळली जात आहेत.
वास्तविक शासकीय नियमाप्रमाणे खासगी रुग्णालयांना सर्वसाधारण वॉर्ड आणि आयसोलेशनसाठी दिवसाला चार हजार, व्हेंटिलेटरविना आयसीयु आयसोलेशनसाठी दिवसाला ७५००, तर व्हेंटिलेटरसह आयसीयु आयसोलेशनसाठी दिवसाला जास्तीत जास्त ९००० रुपये दर आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सध्याचे वास्तव पाहता, खासगी रुग्णालये रुग्णाला भरती करून घेतानाच लाखो रुपये आगाऊ घेत आहेत. पैसे घेऊन बेड मिळवून देण्यासाठी एजंट नेमण्यात आले आहेत. रुग्णाला व्हेंटिलेटर लावला की नाही, कोणते उपचार केले याचा थांगपत्ता लागू न देता, कित्येक पट अधिक बिलांची आकारणी केली जात आहे. खासगी रुग्णालयांच्या लाखोंच्या बिल आकारणीमुळे कित्येक रुग्ण अत्यवस्थ अवस्थेतही घरातच थांबत आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा त्यामध्ये मृत्यू होत आहे.
अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात आहे. आता पाणी डोक्यावरून जायला लागले आहे.
माण-खटाव तालुक्यात अशी लूट आम्ही चालू देणार नाही. नाईलाजाने खासगी रुग्णालयात जावे लागणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी नियमबाह्य बिल आकारणी झाल्यास संपर्क साधावा. खासगी रुग्णालयांनीही गोरगरिबांची लूट न करता शासकीय नियमाप्रमाणे बिल आकारणी करावी, अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही आ. गोरे यांनी दिला.
फोटो:-आ. जयकुमार गोरे