लस वितरणातील घोळ थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:38+5:302021-05-13T04:39:38+5:30
वडूज : ‘कोरोनावरील लसीच्या वितरणात कमालीची अनियमितता दिसत असून, लस लाभार्थी अक्षरशः वैतागलेले आहेत. तेव्हा लस वितरणातील अनियमितता व ...
वडूज : ‘कोरोनावरील लसीच्या वितरणात कमालीची अनियमितता दिसत असून, लस लाभार्थी अक्षरशः वैतागलेले आहेत. तेव्हा लस वितरणातील अनियमितता व घोळ त्वरित थांबवावा,’ अशी मागणी सातारा जिल्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा सचिव प्रा. नागनाथ स्वामी म्हणाले, ‘सध्या ४५ ते ६० या वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेकांचा दुसरा डोस घेण्याची मुदत संपत आली आहे. यातील काहींनी कोविशिल्डचा, तर काहींना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. नागरिक सकाळी लवकर मोठ्या आशेने डोस घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात जातात, आपली नावनोंदणी करतात, १० वाजता ग्रामीण रुग्णालयाची सुरुवात होते. तेथील कर्मचाऱ्यांना लस येणार की नाही, कोणती लस येणार, याची काहीही माहिती नसते. याबाबत कोणी काहीही सांगू शकत नाही. तोपर्यंत लाभार्थी उपाशीपोटी ताटकळत गर्दी कसतात, १२ च्या आसपास लस रुग्णालयात पोहोचते. त्यावेळी कोणती लस आली ते समजते. जी लस आली ती देण्यास सुरुवात होते. बाकीचे रिकाम्या हाताने हुज्जत घालत, बोटे मोडत माघारी जातात, ही बाब अतिशय खटकणारी व खेदजनक आहे.
वास्तविक लस वितरणाचे नियोजन करताना ती लस जिल्ह्याच्या ठिकाणी आदल्यादिवशी येत असेल, तर लस वितरण प्रमुखांनी दुसऱ्यादिवशीचे कोणती लस देणार, कोणत्या केंद्रावर किती लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत, याचे नियोजन वृत्तपत्रात जाहीर करावे. म्हणजे त्याप्रमाणे नागरिक येतील व विनाकारण निर्माण होणारा गोंधळ थांबविता येईल. लस देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होणार नाही. तेव्हा जिल्हा व्यवस्थापनाने याची दखल घेऊन दैनंदिन लस वितरण नियोजन आदल्यादिवशी जाहीर करावे, म्हणजे नागरिकांना व आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मनस्ताप होणार नाही.
---------------------------------