भर पावसात शिरवळकरांचा रास्ता रोको
By admin | Published: July 4, 2016 12:09 AM2016-07-04T00:09:36+5:302016-07-04T00:09:36+5:30
उड्डाणपुलाची मागणी : महामार्गावरील वाहतूक ठप्प; बंदमुळे बाजारपेठेत शुकशुकाट
शिरवळ : शिरवळ येथील महामार्गाच्या अपूर्णावस्थेच्या पार्श्वभूमीवर व उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीसाठी शिरवळ ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने महामार्गावर भरपावसात सुमारे पाच मिनिटे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिरवळमधील व्यापाऱ्यांनी १०० टक्के बंद पाळत पाठिंबा दिल्याने संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. तर रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, रिलायन्स इन्फ्रा व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत दोन महिन्यांत कामे पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे शिरवळ ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले आहे,’ अशी माहिती सरपंच छाया जाधव, उपसरपंच उदय कबुले यांनी दिली.
शिरवळ, ता. खंडाळा येथे भराव पुलाऐवजी उड्डाणपूल उभारावा, अपूर्ण अवस्थेतील सर्व्हिस रस्ते, गटारे, भुयारी मार्गाची कामे पूर्ण करावीत, या मागण्यांकरिता शिरवळ ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने रविवारी शिरवळ बंद पुकारत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार शिरवळ ग्रामस्थांनी अनोखी पद्धत अवलंबत बाजारपेठ याठिकाणी एकत्र आले. टाळ-मृदंगाच्या व ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात दिंडी काढत मोर्चा काढला. यावेळी मोर्चा मेनरोडमार्गे येत शिवाजी चौकात आला. यावेळी भरपावसामध्ये मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत महामार्गाच्या अपूर्ण कामांचा पाढाच वाचला.
यावेळी शिरवळ ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत संबंधित विभागांकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका आंदोलक ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान, यावेळी फलटणचे पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे, प्रातांधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार शिवाजीराव तळपे, पोलिस निरीक्षक संभाजी म्हेत्रे, पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ, पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत, रिलायन्स इन्फ्राचे प्रोजेक्ट डायरेक्टर रतनप्रकाश, प्रोजेक्ट मॅनेजर रामचंद्रन, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रोजेक्ट डायरेक्टर चिटणीस, प्रोजेकट मॅनेजर (टेक्निकल ) श्रीकांत पोतदार यांनी सरपंच छाया जाधव, उपसरपंच उदय कबुले, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे, माजी सभापती गुरुदेव बरदाडे, जिल्हा परिषद सदस्या स्वाती बरदाडे, खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापती सारिका माने, आदेश भापकर, विजय पवार, प्रदीप माने, संजय देशमुख, राजेंद्र मगर, राहुल हाडके, दिलीप गुंजवटे, दशरथ निगडे, बाळासाहेब जाधव यांच्याशी चर्चा करत दोन महिन्यांत संबंधित कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.
तत्पूर्वी शिरवळ ग्रामस्थांनी समारे पाच मिनिटे राष्ट्रीय महामार्ग अडवत आंदोलन केल्याने दोन्ही बाजूंकडे वाहनांच्या रांगा लागल्या; मात्र प्रशासनाने विनंती केल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला. यावेळी रिलायन्स व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून शिर्के पेपर मिलकडील भुयारी मार्गाचे व सर्व्हिस रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
उड्डाणपुलबाबत ठोस आश्वासन नाही...
शिरवळ याठिकाणी भराव पुलाऐवजी उड्डाणपूल उभारण्यात यावा, ही शिरवळकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी चर्चेमध्ये उड्डाणपुलबाबत प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले. असे असले तरी संबंधितांकडून ठोस आश्वासन देण्यात न आल्याने शिरवळला उड्डाणपूल होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, उड्डाणपुलबाबत पाठपुरावा करून मंजूर करून आणणार असल्याचा निर्धार शिरवळ ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.