खासगी बसेसमुळे रास्ता रोको
By admin | Published: October 9, 2016 12:21 AM2016-10-09T00:21:27+5:302016-10-09T00:21:27+5:30
कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर पार्किंग : नागरिक आक्रमक; पोलिसांची धावपळ; उपमार्गावर कोंडी
मलकापूर : येथील कोल्हापूर नाक्यावर खासगी बस अस्ताव्यस्त पार्किंग केल्या जात असल्याने नागरिकांनी आक्रमक होऊन अचानक उपमार्गावर रास्ता रोको केला. त्यावेळी उपमार्गावर वाहतूक कोंडी होऊन पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. उपमार्गावरून संबंधित बस हटवल्यानंतरच नागरिकांनी रस्त्यावरील ठिय्या सोडला.
येथील खरेदी-विक्री संघाचा पंप ते कोल्हापूर नाका परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस अस्ताव्यस्त पार्किंग केलेल्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होणे ही नित्याचीच बाब बनली आहे. नेहमीप्रमाणे बस चालकांनी सोमवारी कोल्हापूर नाका परिसरात उपमार्गावरच पार्किंग केल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.
त्यावेळी उपमार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी संबंधित बसचालकांना बस बाजूला घेण्याची विनंती केली. मात्र संबंधित चालकांनी बस बाजूला घेण्याऐवजी नागरिकांनाच उडवाउडवीची उत्तरे देत अरेरावीची भाषा वापरली.
संबंधित बसचालकाच्या उद्धटपणामुळे आक्रमक होऊन नागरिकांनी आपापली वाहने रस्त्यावर उभी करून अचानक रास्ता रोको केला. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. काही वेळाने पोलिस घटनास्थळी आले.
त्यावेळी नागरिकांबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह काही संघटनेचे पदाधिकारी रस्त्यावर बसले. जोपर्यंत संबंधित बस चालक व मालकांवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही, अशी भूमिका घेत सुमारे अर्धा तास उपमार्गावर ठिय्या मांडला.
पोलिसांनी यापुढे उपमार्गावर बस थांबणार नाहीत, अशी हमी देत संबंधित बस हटवल्यानंतरच नागरिकांनी उपमार्ग वाहतुकीस खुला केला. यावेळी उपमार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. ती कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागली.
दरम्यान अचानक झालेल्या या आंदोलनामुळे वाहनचालकांचीही धांदल उडाली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. (प्रतिनिधी)
पार्किंग केल्यास
पुन्हा आंदोलन
अनेकवेळा सांगूनही खासगी प्रवासी वाहतूक करणारे राजरोसपणे उपमार्गावर अतिक्रमण करतात. रात्रीच्या वेळी तर उपमार्गाबरोबरच महामार्गावरून बेकायदेशीर पार्किंग करून वाहतुकीची कोंडी करतात. याला सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत. यापुढे अशा पद्धतीने बेकायदेशीर पार्किंग झाल्यास पुन्हा असेच तीव्र आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी पोलिसांना यावेळी दिला.
लोखंडी जाळी काढून
रिक्षाला मार्ग
कोल्हापूर नाक्यावर नागरिकांनी अचानक रास्ता रोको केला. त्यावेळी उपमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. शेवटी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महामार्ग आणि उपमार्गामधील लोखंडी जाळी काढून रिक्षाला मार्ग करून दिला.