खुजगावमध्ये रास्ता रोको--चारा छावणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 11:26 PM2017-07-28T23:26:00+5:302017-07-28T23:29:35+5:30
तासगाव : तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई आहे. शेती, पिण्याच्या पाण्यासाठी पाणी योजना सुरु कराव्यात, पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप वाया जाणार आहे.
तासगाव : तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई आहे. शेती, पिण्याच्या पाण्यासाठी पाणी योजना सुरु कराव्यात, पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप वाया जाणार आहे. त्यामुळे तात्काळ चारा छावण्या सुरु कराव्यात, यांसह अन्य मागण्यांसाठी खुजगाव येथील शेतकºयांनी एकत्रित येऊन बस्तवडे फाटी येथे बैलगाड्यांसह रास्ता रोको आंदोलन केले. यानिमित्ताने टंचाईच्या आंदोलनाची पहिली ठिणगी पडली असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकºयांनी दिला.
शेती, द्राक्षबागांसाठीही पाणी नाही. पाणी योजनांचे काम पूर्ण झालेले नाही. योजना सुरु नाहीत. त्यामुळे पूर्व भागात भीषण पाणीटंचाई आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेला पावसाचा अंदाज खोटा ठरला आहे. खरीप वाया जाणार आहे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर आहे. इथून पुढे पाऊस पडला तरीदेखील, पुढील चार महिने चारा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, शेतीसाठीच्या पाणी योजना सुरु कराव्यात, यांसह अन्य मागण्यांसाठी खुजगाव येथील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि शेतकºयांनी बस्तवडे फाटी येथे बैलगाड्यांसमवेत रास्ता रोको करुन ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी टंचाई निवारणासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जोतिराम जाधव, सुभाष पाटील, सुरेश पाटील, राजाराम पाटील, राधेशाम पाटील, वसंत पाटील, प्रकाश देशमुख, मोहन गायकवाडे, बजरंग कदम, शिवाजी पाटील, बाबासाहेब पाटील, अमृत गायकवाड आदी उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुधाकर देशमुख यांना देण्यात आले. आंदोलन शांततेत व्हावे, यासाठी पोलिस निरीक्षक राजन माने यांच्यासह पोलिस घटनास्थळावर उपस्थित होते.
तीन वर्षांपासून हुलकावणी
तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या तीन वर्षापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे पाणी पातळी खालावली आहे. पिण्यासाठी टँकरने होणारा पाणीपुरवठा पुरेसा होत नाही.