जड शब्द वापरून बुद्धी असल्यासारखे दाखविणे बंद करा: उदयनराजे

By admin | Published: November 18, 2016 11:09 PM2016-11-18T23:09:04+5:302016-11-18T23:09:04+5:30

आमदारांच्या विचारांची बैठकच सेटलमेंट, भ्रष्टाचार, खंडणी याच शब्दांच्या वर्तुळात

Stop showing off the intellect by using heavy words: Udayan Raje | जड शब्द वापरून बुद्धी असल्यासारखे दाखविणे बंद करा: उदयनराजे

जड शब्द वापरून बुद्धी असल्यासारखे दाखविणे बंद करा: उदयनराजे

Next

सातारा : ‘सर्वसामान्य उमेदवार आणि राजघराण्यातील उमेदवार हा बुद्धिभेद नाही तर वस्तुस्थिती आहे. उगाच बुद्धिभेदासारखे जड शब्द वापरून आपण फार बुद्धीचे आहोत, असे दाखवणे बंद करा. करंजे प्रभागातील उमेदवार तांत्रिक कारणाने पुरस्कृत केला आहे. आमदारांच्या विचारांची बैठकच सेटलमेंट, भ्रष्टाचार, खंडणी याच शब्दांच्या वर्तुळात मर्यादित असल्याने आर्थिक तडजोड, खंडणी, भ्रष्टाचार या पलीकडे त्यांना काहीच दिसत नाही,’ अशी सणसणीत चपराक सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष, खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावली.
सातारा विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी कदम आणि प्रभाग ५ मधील नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान आयोजित एका बैठकीत खासदार उदयनराजे भोसले नागरिकांशी हितगुज केले. त्यावेळी ते बोलत होते.
‘कावीळ झालेल्या व्यक्तीला सर्व जग पिवळे दिसते, तसेच काहीसे आमदारांचे झाले आहे. ते सतत खंडण्या, सेटलमेंट, भ्रष्टाचार यामध्येच गुरफटले असल्याने त्यांना सगळीकडेच खंडणी, सेटलमेंट आणि भ्रष्टाचार दिसत असावा. कार्यकर्त्यांना नगरसेवक म्हणून संधी देताना, सामाजिक आरक्षणाशिवाय संभाव्य उमेदवाराचे चारित्र, समाजामधील त्याचे स्थान, समाजकार्याची तळमळ, निवडून येण्याची क्षमता आदी बाबींचा प्रामुख्याने विचार करूनच सर्वांनुमते आम्ही उमेदवारी दिलेली आहे. यामध्ये समाजकार्याची तळमळ आणि चारित्र, निवडून येण्याची क्षमता यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आम्ही सेटलमेंट करून करंजे येथील उमेदवार पुरस्कृत केला, असा आरोप करणाऱ्यांनी मात्र खंडणी, जबरी मारहाण, विनापरवाना हत्याराने सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून दहशत निर्माण करणे, सार्वजनिक शांततेचा भंग, असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या बाळू खंदारे नामक व्यक्तीला अधिकृतपणे नगरविकास आघाडीची उमेदवारी दिली आहे. वारांगना व्यवसायास हातभार लावल्याबद्दल गुन्हा दाखल असलेल्या योगेश चोरगे या व्यक्तीला त्यांनी त्यांच्या आघाडीच्या माध्यमातून पुरस्कृत केले आहे. यावरून त्यांनी नैतिक अध:पतनाचा तळ गाठला आहे,’ असेही उदयनराजे भोसले म्हणाले.
त्यांची वैचारिक पातळीच खंडणी, भ्रष्टाचार याच वर्तुळात असल्याने आणि सातत्याने तोच विचार जनतेला लुटण्यासाठी करीत असल्याने त्यांनी गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला नगराच्या सेवक पदाची संधी देणे साहजिकच आहे. तथापि, हेच लोक चोराच्या उलट्या बोंबा मारतात याचेच हसू येते. याच आमदारांच्या नेतृत्वाखालील अजिंक्यतारा बँकेच्या मॅनेजरपदावर काम करणाऱ्या जयेंद्र जाधव व्यक्तीची मानसी या नावाची व इतर नावाची कोट्यवधींची तारांकित हॉटेल्स बँक बुडत असताना उभारली जातात याचा अन्वयार्थ काय असावा, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
नगरविकास आघाडीचे ४० शर्विलक मैदानात...
‘काहीही करून ‘बाय हुक आॅर क्रुक’ सत्ता मिळविणे व ती स्वत:च्या स्वार्थासाठी वापरणे ऐवढाच अजेंडा नगरविकास आघाडीकडे आहे. त्यांच्या अजेंड्यातून ते सातारकरांना दाखवत असलेली छानछान स्वप्ने या परिकल्पना आहेत हे सर्वांनी जाणले आहे़ या कल्पना कधीही सत्यात उतरत नाहीत़ आमच्या उमेदवारांना कठपुतळे संबोधणाऱ्यांनी त्यांचे जे ४० शर्विलक मैदानात उतरविले आहेत़ ते कोणाचे कठपुतळे आहेत?,’ असा खणखणीत सवाल सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीनिमित्त नागरिकांच्या गाठीभेटी कार्यक्रमात ते बोलत होते़
खंडणी पालिका करायची आहे का?
‘आमदारांना सातारा शहराचा काय विकास करायचाय याची झलक अनेक उदाहरणावरून दिसते. त्यांच्या हातात सत्ता देऊन सातारकरांना नगरपालिकेची खंडणी पालिका करायची आहे का ? असा प्रश्न आता सातारकरच त्यांना ठिकठिकाणी विचारतील,’ असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलताना स्पष्ट केले.
 

Web Title: Stop showing off the intellect by using heavy words: Udayan Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.