सातारा शहरातील जुलमी वाहतूक व्यवस्था थांबवा, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 01:17 PM2019-07-24T13:17:29+5:302019-07-24T13:19:35+5:30
सातारा शहरातील कर्मवीर पथावर पोलीस अधीक्षक कार्यालय ते शेटे चौकादरम्यान करण्यात आलेली जुलमी एकेरी वाहतूक रद्द करावी. तसेच या रस्त्यावर दुहेरी वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी शहरातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
सातारा : शहरातील कर्मवीर पथावर पोलीस अधीक्षक कार्यालय ते शेटे चौकादरम्यान करण्यात आलेली जुलमी एकेरी वाहतूक रद्द करावी. तसेच या रस्त्यावर दुहेरी वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी शहरातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
पोलीस प्रशासनाने कर्मवीर पथावर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय ते शेट चौक या मार्गावर २ जुलैपासून वाहतुकीत बदल करण्यात आला. या निर्णयाविरोधात शहरातील व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या असली तरी पोलिसांनी त्याची फारशी दखल घेतलेली नाही.
शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यथा मांडली. या रस्त्यावर कधीही वाहतूक कोंडी होत नाही. या मार्गावर शाळा व महाविद्यालय आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयापासून शेटे चौकाकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. या मार्गावर अनेक अंतर्गत रस्ते आहेत. एकेरी वाहतुकीमुळे विद्यार्थी तसेस स्थानिक रहिवासी, व्यापारी यांची कोंडी झालेली आहे.
एकेरी वाहतुकीबाबत कुठल्याही नागरिकाने अथवा व्यापाऱ्याने मागणी केलेली नाही. शेटे चौकाकडे जाणारी वाहतूक बंद झाल्याने ग्राहक फिरकत नसल्याने व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. शासनाला कर भरणारे व्यापारी वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराने त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरील एकेरी वाहतूक तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
भरतशेठ राऊत, अशोक गांधी, सलीम खान, प्रशांत पांगे, राजेंद्र कळसकर, रियाज शेख, फारुख हकीम, इरफान कच्छी, अतुल माळी, भीमराव तपासे, सुशांत भस्मे, एजाज शेख, भाऊ जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या समस्येबाबत लवकरच बैठक लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले.
शहरातून हरकतीही मागविल्या नाहीत
सातारा शहर वाहतूक पोलिसांनी या परिसरातील नागरिक व्यापारी वर्गाला कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच जाहीररीत्या कोणत्याही हरकती सूचना अथवा आक्षेप न मागवता मनमानीपणे दुहेरी वाहतूक बंद केली आहे. हा वाहनधारक, स्थानिक रहिवासी तसेच व्यापाऱ्यावर अन्याय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.