बारामतीला पळविणारे पाणी थांबवा
By admin | Published: March 6, 2015 11:36 PM2015-03-06T23:36:51+5:302015-03-06T23:44:25+5:30
शिवतारेंनी खडसावले : कुठल्याही दादाच्या दबावाला बळी पडू नका
फलटण : ‘सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या हक्काचे नीरा-देवधरचे पाणी यापुढे बारामतीला जाऊ देऊ नका,’ अशा शब्दात सक्त आदेश देऊन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी नीरा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना खडसावले की, ‘तुम्ही अधिकारी आहात की भित्ताड, कोणत्याही दादाच्या दबावाला बळी पडाल, तर याद राखा.’
फलटण येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री शिवतारे बोलत होते.
‘जिल्ह्यातील प्रलंबित धरणे व कालव्यांच्या कामांसाठी निधीची तरतूद केली जात आहे. लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, ही शासन व आमची भावना आहे. नीरा-देवधरच्या पाण्यावर हक्क नसताना बारामतीला ते पळविले जात आहे. पाण्यावर ज्याचा हक्क आहे, त्यांनाच ते पाणी मिळाले पाहिजे,’ अशा शब्दांत शिवतारे यांनी नीरा-उजवाच्या कार्यकारी अभियंत्यांना बजावले.
दरम्यान, त्यावर पाणी वाटप समितीची बैठक झाली असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे संबंधित अभियंत्यांनी सांगितले. यावर शिवतारे चांगलेच संतप्त झाले. ‘तुम्ही अभियंता आहात की भित्ताड. मी सांगतो त्याप्रमाणे करा. समिती बरखास्त झाली आहे. कोणत्याही दादाचा दबाव सहन करू नका. ज्याच्या हक्काचे पाणी आहे त्यालाच मिळेल तेवढे बघा,’असे त्यांनी खडसावले.
प्रशासन अद्यापही युती शासनाशी जुळले नसल्याचे निदर्शनास आणून देताच ‘सर्वत्र हीच परिस्थिती आहे. सातारा सरळ केले आहे. आता फलटणही करू,’ असे शिवतारे यांनी स्पष्ट केले.
येथील औद्योगिक वसाहतीतील कंपनीत भूमिपुत्रांना रोजगार मिळत नसल्याचे निदर्शनास आणून देताच, याप्रश्नी आपण लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेतील आग संशयास्पद
फलटण पालिकेच्या गोडावूनला बुधवारी (दि. ४) रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली. यासंदर्भात आपणाकडे तक्रार आली असल्याने आपण प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यामध्ये संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत. या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
‘श्रीराम’च्या निवडणुकीत पॅनेल उतरवणार
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना शिवतारे म्हणाले, ‘शिवसेना सर्व समविचारी लोकांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीनिशी पॅनेल उतरविणार आहे. खासदार राजू शेट्टी, आमदार महादेव जानकर यांच्याशी चर्चा झाली असून, या पॅनेलमध्ये निष्ठावंतांना स्थान देणार आहे. यामध्ये दल बदलूंना स्थान असणार नाही. ही निवडणूक आपण गांभीर्याने घेत आहे.’ (प्रतिनिधी)