कोयनेतून पाण्याचा विसर्ग थांबवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:44 AM2021-08-21T04:44:36+5:302021-08-21T04:44:36+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कमी-जास्त होत असून, शुक्रवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला १९ तर नवजा येथे २० मिलिमीटर पावसाची ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कमी-जास्त होत असून, शुक्रवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला १९ तर नवजा येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक थांबल्याने कोयनेच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेतून पाणी सोडणे पूर्णपणे बंद झाले आहे. धरणात ९२.८० टीएमसी इतका साठा झाला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात महिन्यापूर्वी धुवाँधार पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात तर तुफान वृष्टी झाली. यामुळे शेतीचे नुकसान झाले तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाण्याची आवक झाली. कोयना धरणाच्या इतिहासातील हा एक विक्रम ठरला. त्यामुळे अवघ्या काही दिवसात कोयना धरणातील पाणीसाठा ९० टीएमसीच्यावर पोहोचला होता. तर कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला व पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यात आली.
सध्या पश्चिम भागात पाऊस कमी-जास्त होत आहे. प्रमुख धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे तर कोयना धरणात आवक बंद झाली. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपासून धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे तर १५ दिवसांपूर्वीपासूनच धरणाचे दरवाजे बंद आहेत.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला १० मिलिमीटर पाऊस झाला तर जूनपासून आतापर्यंत ३५२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे २० व यावर्षी आतापर्यंत ४,५६८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंत १९ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर जूनपासून महाबळेश्वरला ४,७४९ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.
............................................................................