कोयनेत ९६ टीएमसीवर साठा, ९१ टक्के पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 03:55 PM2020-08-25T15:55:48+5:302020-08-25T15:57:17+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर एकदम कमी झाला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४८ तर नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजातील विसर्ग बंद आहे. धरणात ९६.४३ टीएमसी साठा झाला असून टक्केवारी ९१.७० आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर एकदम कमी झाला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४८ तर नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजातील विसर्ग बंद आहे. धरणात ९६.४३ टीएमसी साठा झाला असून टक्केवारी ९१.७० आहे.
सातारा शहरासह पश्चिम भागात मागील तीन आठवड्यांपूर्वी पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला कोयनानगर, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर भागात दमदार पाऊस कोसळला. तसेच धरण क्षेत्राही पावसाने धुवाँधार हजेरी लावली. त्यामुळे कोयना, तारळी, धोम, उरमोडी, बलकवडी, कण्हेर यासारख्या प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी धरणे भरू लागली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वच धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला.
सध्यस्थितीत कमी अधिक फरकाने धरणांमधून विसर्ग सुरूच आहे. त्यातच सध्या पावसाचा जोर एकदम कमी झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे कोयनेचे दरवाजे बंद आहेत.
फक्त पायथा वीजगृहातूनच २०५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळच्या सुमारास धरणातील साठा ९६.४३ टीएमसी ऐवढा झाला होता. धरण भरण्यास अजून जवळपास नऊ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४८ आणि यावर्षी आतापर्यंत ४०२७ मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजाला सकाळपर्यंत २७ व जूनपासून आतापर्यंत ४५९४ आणि महाबळेश्वरला २७ व यावर्षी आतापर्यंत ४४४७ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
सातारा शहरात उघडीप...
सातारा शहरात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी ऊन पडले. तर पूर्व भागात पावसाची उघडीप कायम आहे.