कथा ‘माणुसकी’च्या मोलमजुरीची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:37 AM2017-08-03T00:37:29+5:302017-08-03T00:37:35+5:30

Stories of 'Manusaki'! | कथा ‘माणुसकी’च्या मोलमजुरीची !

कथा ‘माणुसकी’च्या मोलमजुरीची !

googlenewsNext
ठळक मुद्दे साहित्यिकाला बायका-पोरांचं पोट भरण्यासाठी दुसºयाचा शेतात मजुरी करवी लागतेय.


अजय जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज : शालेय पाठ्यपुस्तकात ‘माणुसकी अन् मोठेपणा’ या कथा लिहिणाºया एका ग्रामीण लेखकाला आज घरातील दोनवेळची चूल पेटविण्यासाठी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून राबावं लागतंय. जगाला माणुसकीची किंमत शिकविणाºया या साहित्यिकाला बायका-पोरांचं पोट भरण्यासाठी दुसºयाचा शेतात मजुरी करवी लागतेय.
‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, बाबा कदम यांनी लिहिलेल्या पुस्तकांनीच मला लिहिण्याची प्रेरणा दिली. तीन कादंबºया, तीन कथासंग्रह, एक चरित्र लिहिले, हे सांगणाºया कºहाड तालुक्यातील मरळी येथील लेखक शंकर कवळे यांच्या ‘माणुसकीचा मोठेपणा’ या कथा संग्रहातील माणुसकी आणि मोठेपणा ही कथा चौथीच्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात घेण्यात आली आहे.
कºहाड तालुक्यातील मरळी हे छोटं गाव. खंडोबाच्या पाली या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेलं आहे. या गावात शंकर दिनकर कवळे यांचा जन्म झाला. वडील दिनकर हे दोरखंड वळायचे काम करत तर आई शकुंतला शेतमजुरी करायची. पाच भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार. एक गुंठा जमीन नाही. गरिबी पाचवीला पुजलेली; पण शंकर यांना शिकायचं होतं. घरच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि शेवटी परिस्थिती पुढे हार पत्करली. दुगलीवरची गाई घेऊन तिला चरण्यासाठी डोंगर गाठू लागले; पण काही तरी शिकायचेच ही इच्छा गप्प बसू देत नव्हती. मोठ्या भावाने आणलेली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, बाबा कदम यांची पुस्तके ते डोंगरात बसून वाचू लागले आणि हीच पुस्तके त्यांच्या लेखणीला प्रेरणादायी ठरली.
हुंडाविरोधी ‘आरती’, प्रेम कसे असावे सांगणारी ‘अनुराग’ आणि ग्रामीण भागातील वास्तव सांगणारी ‘बिजली’ या तीन कादंबºया अस्तित्वात आल्या. ‘माणुसकीचा मोठेपणा, खरा माणूस, बुद्धिमान बिरबल’ हे कथासंग्रह तयार झाले आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे चरित्र त्यांनी लिहिले.
लेखक शंकर कवळे सांगतात, ‘मी लिखाणास सुरुवात केली की तहान, भूक हरपते. फक्त लिखाणच सुरू होते. हे सर्व लिखाण मी गावातील ज्योतिबा देवळाच्या गाभाºयात बसून केले आहे. घर अपुरे, त्यामुळे देऊळच घर होते. गाभाराच लिखाणाची खोली बनवली. लिहिलेले लिखाण प्रकाशित करण्यासाठी खूप ठेचा खाल्या. अल्प मानधनात वितरकांना हक्क दिले. पण पुस्तके प्रकाशित केली. मला अधिकाधिक मानधन मिळाले ते म्हणजे चार हजार रुपये. हीच आत्तापर्यंतची अधिकची कमाई.’
शंकर कवळे हे आज दहा बाय दहाच्या खोलीत राहतात. पावसाने ओले झालेल्या या खोलीत शंकररावांच्या माणुसकीचा मोठेपणापासून इतर सर्व पुस्तके पाहताना, वाचताना मन मात्र ओलेचिंब होऊन जाते. प्लास्टिकच्या पिशवीतून ते एक-एक पुस्तक बाहेर काढत होते. त्यांची वास्तववादी लिखाणाची शैली मनाला भुरळ पाडत होती.
बोलत-बोलत शंकरराव स्वत:च्या आयुष्याच्या पुस्तकाचे एक-एक पान उलगडू लागले. लग्न उशिरा झाले. लग्न करून घरात आल्यानंतर पत्नी पूनम या दुसºयाच्या शेतात शंकररावांच्या बरोबर मजुरी करण्यास जाऊ लागल्या. ते आजअखेर सुरूच आहे. पण पती लेखक आहेत, याचा मात्र त्यांना नितांत अभिमान आहे. शंकररावांची मुलगी कादंबरी सध्या सातवीत शिकतेय आणि मुलगा विश्वम हा दीड वर्षाचा आहे.
कादंबरी घरातच होती म्हणून सहज विचारले, ‘शाळेत का गेली नाही? तर शंकरराव बोलले, ‘आजारी आहे, दवाखान्यात न्यायची आहे. पण पैसे नाहीत म्हणून नेली नाही. उद्या नेणार आहे.’ एवढी विदारक परिस्थिती दिसून आली. पण अजूनही शंकरराव खचले नाहीत. घराकडे पाहून म्हणाले, ‘घरकुल मिळतंय जागा नाही; पण बघू अजून खूप लिहायचं आहे, पण वेळ मिळत नाही. सर्व वेळ जगण्यासाठीच्या कमाई वर जातोय.’
पाठ्यपुस्तकात तुमची कथा कशी काय प्रसिद्ध झाली? या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, ‘एका मासिकात लोकशाहीत वागावं कसं? हा मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला होता. हा लेख वाचून जयसिंगपूरचे प्रा. जगन्नाथ गवळी यांनी संपर्क साधला. माझे सर्व लिखाण त्यांनी वाचले आणि कथासंग्रह पाठ्यपुस्तक महामंडळाकडे पाठवून देण्यास सांगितले. मी वर्षापूर्वी कथासंग्रह पाठवून दिला आणि महामंडळाने माझी कथा चौथीच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकासाठी निवडली आणि प्रसिद्धही केली. याबाबत मला दरवर्षी मानधन मिळणार आहे, ते फक्त दोनशे रुपये.’
शंकरराव सांगतात, ‘माझा गावात कोणी मित्र ही नाही आणि शत्रूही. मी आणि कुटुंब या पुरताच मर्यादित असतो. अजून खूप लिखाण करायचं आहे. जे डोक्यात आहे, ते लेखणीतून उतरण्यासाठी मला वेळ पाहिजे. हा वेळ मिळण्यासाठी मला जगण्याच्या लढाईतून उसंत मिळणे गरजेचे आहे.’ शंकररावांना ही उसंत मिळण्यासाठी त्यांची लेखणी पुन्हा परजण्यासाठी शासन, समाजसेवी संघटना आणि वाचक यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात मिळेल का, हा प्रश्न आहे.
पुस्तके राज्याच्या कानाकोपºयात वितरीत
शंकरराव कवळे यांनी ‘आरती’ ही कादंबरी लिहिली, त्याची एकच प्रत त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ही कादंबरी ते इतरांना वाचण्यासाठी देऊ ही शकत नाहीत. त्यांची प्रसिद्ध झालेली सर्व पुस्तके त्यांनी नाममात्र मानधन घेऊन वितरकांना सर्व हक्कासह दिली आहेत. काहीचे मानधन ही मिळालेले नाही. शंकरराव कवळे लिखित पुस्तके मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपºयात वितरीत झाली आहेत. हे त्यांना वाचकांनी पाठवलेल्या पत्रांमुळे लक्षात येते.
लेखनशैलीची खासियत...
चंद्रपूर जिल्ह्यातील सोनेगाव (बिगूर) येथील लीना ढोणे या पत्रातून लिहितात, ‘तुमची सर्व पुस्तके वाचली. तुमची पुस्तके वाचत असताना वाटते समोर जणू काही नाटकच सुरू आहे, असा भास होत होता.’ अशी आलेली पत्रे कवळे यांच्या लेखनशैलीची खासियत निदर्शनास आणून देताना दिसून येतात.

Web Title: Stories of 'Manusaki'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.