धनगर समाजाचे वादळ माणदेशात घोंगावले

By admin | Published: March 16, 2017 11:33 PM2017-03-16T23:33:32+5:302017-03-16T23:33:32+5:30

हजारो बांधवांचा समावेश : अहिल्या कन्यांकडून अनुसूचित जमाती दाखला मागणीचा तहसीलदारांना अर्ज; क्रांतीची मशाल पेटविली

The storm of Dhangar community was nestled in the country | धनगर समाजाचे वादळ माणदेशात घोंगावले

धनगर समाजाचे वादळ माणदेशात घोंगावले

Next



दहिवडी : सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंतीदिनी ‘एक लढा जातीचा, धनगरांच्या ख्यातीचा’ अशी घोषणा देत हजारो धनगर समाज बांधवांच्या मल्हार क्रांतीचे वादळ गुरुवारी दहिवडी तहसील कार्यालयावर घोंगावले. माण तालुक्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने अहिल्या कन्यांनी अनुसूचित जमाती दाखला मागणीचा अर्ज तहसीलदार सुरेखा माने यांच्याकडे सुपूर्द करत आरक्षणाचे सुंबरान मांडले. रणरणत्या उन्हात हजारोंच्या साक्षीने मल्हार क्रांतीची मशाल पेटविण्यात आली. आरक्षण मिळेपर्यंत ही मशाल तेवत ठेवण्याचा निर्धार समाज बांधवांनी यावेळी केला.
धनगर समाजाने अनुसूचित जमातीत समाजाचा समावेश करावा, या मागणीसाठी एल्गार केला होता. त्यानंतर आघाडी सरकार संपून महायुतीची सत्ता आली. सत्ता आल्यानंतर युती शासनाला आश्वासनांचा विसर पडला. धनगर बांधवांची मागणी जैसे थे राहिली. त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी फक्त घोषणा न देता कृतीशील आंदोलन करण्याचा निर्धार धनगर समाज बांधवांनी केला. त्याचेच पहिले पाऊल म्हणून माणमध्ये प्रत्यक्ष दाखला मागणी अभियानासाठी मल्हार क्रांती मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले. दोन महिन्यांपासून या अभिनव आंदोलनाची तयारी सुरू होती. माणमधील वाडी-वस्तीवर जाऊन या आंदोलनाची माहिती देऊन अर्ज भरून घेण्यात येत होते.
सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंतीदिनी मल्हार क्रांतीच्या आंदोलनाचा एल्गार होणार होता. त्यासाठी संपूर्ण दहिवडी शहर सज्ज झाले होते. जागोजागी पिवळे ध्वज फडकत होते. तर मल्हार क्रांतीचे फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. गुरुवारी सकाळपासूनच तालुका व जिल्ह्याच्या विविध भागांतून धनगर बांधव दहिवडीच्या दिशेने येत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास दहिवडी येथील सिद्धनाथ मंदिरात अहिल्या कन्यांच्या हस्ते सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर मूक मोर्चास सुरुवात करण्यात आली.
मोर्चाच्या अग्रभागी युवती, महिला होत्या. त्यांच्या पाठीमागे पुरुष होते. तर सर्वात शेवटी विविध पक्षांचे पदाधिकारी होते. या मोर्चामध्ये मेंढपाळापासून शेतकरी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, उद्योजक, तरुण या सर्वांचा सहभाग होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत सिद्धनाथ मंदिरापासून मार्डी चौक, मायणी चौक, फलटण चौक, कर्मवीर पुतळ्यापासून तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयाजवळ आल्यावर अहिल्या कन्यांनी या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर तहसीलदार सुरेखा माने या तहसील कार्यालयासमोर येऊन मोर्चास सामोऱ्या गेल्या.
मागील दोन महिन्यांपासून तालुक्यातून भरण्यात आलेले ७५५१ दाखला मागणी अर्ज अहिल्या भगिनींनी तहसीलदार माने यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर या आंदोलनाची सांगता झाली. (प्रतिनिधी)
नगरपंचायतीकडून पाणीपुरवठा...
पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांच्या नेतृत्वाखाली माण व खटावमधील पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे वाहतुकीचा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कसलाही प्रश्न निर्माण झाला नाही. तसेच दहिवडी नगरपंचायतीने या मोर्चास टँकरने पाणीपुरवठा केला.

Web Title: The storm of Dhangar community was nestled in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.