दासनवमी संगीत महोत्सवाची सांगता
By admin | Published: February 13, 2015 09:39 PM2015-02-13T21:39:32+5:302015-02-13T22:53:25+5:30
समर्थ सेवा मंडळ : मंजुशा पाटील यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
सातारा : श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सज्जनगड येथे आयोजित दासनवमी संगीत महोत्सवाच्या नवव्या दिवशी शास्त्रीय रागदारी व विविध पदे व अभंगांचे गायन करत मंजूषा पाटील यांनी आपल्या भारदस्त आवाजाची जादू उपस्थितांवर करत या महोत्सवाची सांगता केली.आपल्या गायन सेवेची सुरुवात मंजूषा पाटील यांनी ‘श्री’ रागाने केली. अत्यंत कमी गायक या रागाकडे वळतात व तो गातात, असा हा राग सादर करताना मंजूषा पाटील यांनी राग पंचायनातील पं.अंतुबुवा यांची ‘श्री’ रागातील ‘चलो रे माही रामसिया दर्शन को चलो रे माही..’ सादर केले. त्यानंतर राम व सीतेचे होळी खेळतानाचे रंग अर्थात ‘खेलत रामसिया संग होली, पिचकारी उडत चली...’ हे पद सादर केले. समर्थ रामदास स्वामींनी रचलेले ‘कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान..’ या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.मंजुषा पाटील यांना तबला साथ पं. भरत कामत यांनी तर संवादिनीवर साथ श्रीराम हसबनीस यांनी केली. पखवाज प्रसाद जोशी, टाळाची साथ माउली टाकळकर यांनी, तर चिपळी साथ मिलिंद देवरे यांनी केली. तर सहगायन साथ शिलिन केळकर, रसिका वैशंपायन, सायली पाटील व श्रावणी शिखरे यांनी केली. या गायन सोहळ्यात सुप्रसिद्ध निवेदक स्वानंद बेदरकर यांची निवेदनाची साथ अनेकदा वाहवाची दाद मिळवून देणारी ठरली. या सर्व कलाकारांचा तसेच ध्वनी संयोजक सुभाष कुंभार, विजयराव कदम, गोविंदराव बेडेकर, हेमंत बेडेकर यांचा सत्कार सातारा येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह मारुतीबुवा रामदासी व समर्थ भक्त मीनाताई देशपांडे यांनी श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन केले. (प्रतिनिधी)