‘उज्ज्वला’च्या घरात पुन्हा चुलींचा धूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:40 AM2021-03-27T04:40:56+5:302021-03-27T04:40:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : केंद्र शासनाने महिलांचा चुलीच्या धुरापासून बचाव व्हावा, त्या निरोगी राहाव्यात म्हणून मोठ्या थाटात उज्ज्वला ...

Stove smoke in Ujjwala's house again! | ‘उज्ज्वला’च्या घरात पुन्हा चुलींचा धूर!

‘उज्ज्वला’च्या घरात पुन्हा चुलींचा धूर!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : केंद्र शासनाने महिलांचा चुलीच्या धुरापासून बचाव व्हावा, त्या निरोगी राहाव्यात म्हणून मोठ्या थाटात उज्ज्वला गॅस योजना आणली. महिलांना फुकट गॅस कनेक्शन देण्यात आले. मात्र, गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्याने उज्ज्वलाच्या घरात पुन्हा एकदा चुलींचा धूर पाहायला मिळत आहे.

शासनाने २०१६मध्ये उज्ज्वला गॅस योजना आणली. यासाठी प्रत्येक कनेक्शनला एक हजार ६०० रुपयांचे अनुदान देण्यात आले. गॅस सिलिंडरसाठी द्यावी लागणारी अनामत रक्कम १,२०० रुपये, रेग्युलेटर, सुरक्षा पाईप गॅस कार्ड आणि प्रशासकीय खर्च यातून सूट देण्यात आल्यामुळे महिलांना फुकट गॅस कनेक्शन मिळाले. गॅस शेगडी तेवढी खरेदी करावी लागली.

वर्षानुवर्षे चुलीपुढे फुंकणी घेऊन धुराचा त्रास सोसणाऱ्या महिलांना ही योजना म्हणजे संजीवनीच असल्याचे वाटले. दुर्गम भागामध्ये पावसाळ्याआधी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जळण फाटा गोळा केला जातो तसेच त्याची साठवणदेखील केली जाते. मात्र, घरात गॅस आल्याने बहुतांश घरांमध्ये जळण फाटा बंद झाला. तर शासनाने गॅस दिल्याने रेशनवरचे रॉकेलही बंद केले. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये रेशनवर रॉकेल मिळत नाही.

दरम्यान, केंद्र शासनाने एप्रिल २०२०पासून गॅसवरचे अनुदान पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांना गॅस सिलिंडर प्रचलित दरामध्ये घ्यावा लागतोय. ग्रामीण भागात ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, असे लोक गॅस घेतात. मात्र, अनेकांनी गॅस सिलिंडर बाजूला ठेवून चुली पेटवल्या आहेत. महिलांची धुरापासून मुक्तता करण्याचा जो उद्देश उज्ज्वला योजनेने साधला होता, तो गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे पूर्णपणे धुळीला मिळाला आहे. महिलांनी पुन्हा जळण, काट्याकुट्या गोळा करून चुली पेटवायला सुरुवात केली आहे. गॅसचे अनुदान कायमस्वरूपी बंद झाले तर ‘उज्ज्वला’च्या घरामध्ये दिलेले गॅस सिलिंडर केवळ शोपीस ठरले आहेत, असे म्हणायला वाव आहे.

असे वाढले गॅसचे दर

जानेवारी २०२० : ७०७ रुपये

जुलै २०२० : ५९९ रुपये

जानेवारी २०२१ : ६९९ रुपये

फेब्रुवारी २०२१ : ७९९ रुपये

मार्च २०२१ : ८३० रुपये

गॅस सिलिंडर कोपऱ्यात

सध्या ८३० रुपये दराने गॅस सिलिंडर विकला जात आहे. सरकारने अनुदान बंद केले असल्याने एवढी मोठी किंमत देऊन गॅस खरेदी करणे गरिबांना परवडत नाही. त्यामुळे अनेकांनी घराच्या कोपऱ्यात गॅस सिलिंडर ठेवला आहे तर चुलीच्या कोपऱ्यात जळणाचा बिंडा पडलेला दिसतो.

कोट

आम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नात चहा, साखर, तेल, चटणी, भाजी एवढ्याच गोष्टी आम्ही खरेदी करू शकतो. त्यातूनही गॅस खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करत होतो. मात्र, अनुदान मिळत नसल्याने एवढ्या किमतीने गॅस खरेदी करणे आम्हाला शक्य नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे.

- कृष्णाबाई पवार, उज्ज्वला गॅसधारक महिला

फोटो आहे

Web Title: Stove smoke in Ujjwala's house again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.