युवकाच्या खुनानंतर कोरेगावात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:17 PM2017-08-22T23:17:39+5:302017-08-22T23:17:39+5:30

Strain in Koregaon after the murder of the youth | युवकाच्या खुनानंतर कोरेगावात तणाव

युवकाच्या खुनानंतर कोरेगावात तणाव

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : नातेवाइकाला दमदाटी केल्याचा जाब विचारल्यामुळे काही युवकांनी कोरेगावच्या नवीन बसस्थानकासमोर एकाला चाकूने भोसकले. साताºयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शंभू बबन बर्गे (वय ३०, रा. वेताळगल्ली टेक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
दरम्यान, खुन्यांना अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेत मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात आणला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधिकाºयांनी समजूत काढल्यानंतर तासाभराने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपनगराध्यक्ष जयवंत पवार यानेच गेम केल्याचे शंभू बर्गे याने मृत्युपूर्वी सांगितले असून, तसे मंदार आबासाहेब बर्गे याने फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, श्री केदारेश्वर मंदिराची श्रावणी सोमवारनिमित्त यात्रा होती. जुनी पेठ-केदारेश्वर मंदिर रस्ता परिसरात वास्तव्यास असलेल्या शुभम मोरे याची सायंकाळच्या सुमारास करण बनकर (रा. कळकाई गल्ली) याच्याशी शाब्दिक चकमक झाली. करणने शुभमला शिवीगाळ करत दमदाटीदेखील केली. हा प्रकार शुभमने जवळचा नातेवाईक मंदार बर्गे याला सांगितला. मंदार व त्याच्या मित्रांनी कळाकाई गल्लीत जाऊन करण बनकरला जाब विचारला. त्याचा राग आल्याने करणचा मित्र असलेल्या अर्जुन डेरे याने अक्षय जगदीश बर्गे याच्या पायाला लोखंडी रॉड मारला. त्याच वेळी करण बनकर याने शंभू बबन बर्गे याच्यावर चाकूने वार केला. शंभू याने पहिला वार चुकवला. दुसरा वार मात्र, त्याच्या हाताला चाटून गेला.
करण व त्याचे मित्र निघून गेल्यानंतर अक्षय बर्गेला त्याच्या मित्रांनी लक्ष्मीनगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले. वैद्यकीय अधिकाºयांनी शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रात्री साडेनऊच्या सुमारास शंभू बर्गे याने अक्षयची रुग्णालयात विचारपूस केली. त्यानंतर तो नवीन बसस्थानकासमोर असलेल्या हॉटेल शिवरत्नकडे गेला.
तेथे दुचाकीवरून आलेल्या काही युवकांनी पिछाडीवर तीन वार केले. शंभू हा पाठीमागे वळल्यानंतर त्याच्या उजव्या बरगडीत धारदार चाकूने वार करण्यात आला. हा वार इतका जोरात होता की, चाकू बाहेर निघालाच नाही. रक्ताच्या थारोळ्यात शंभू पडल्याचे पाहिल्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले.
साताºयाकडे नेले जात असताना रुग्णवाहिकेत शंभू बर्गे हा विव्हळत होता, ‘जयवंत पवार यानेच माझ्यावर गेम केली आहे,’ असे तो रामदास रमेश बर्गे व अक्षय संजय बर्गे यांना सांगत होता. रात्री अकराला त्याच्यावर साताºयातील रुग्णालयात उपचारास सुरुवात केली. मात्र, मध्यरात्री एकच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
अपर पोलिस अधीक्षक विजय पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्मााकर घनवट सकाळी कोरेगाव पोलिस ठाण्यात आले. त्यांनी संशयितांची चौकशी केली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींची विचारपूस केली. पोलिस निरीक्षक संभाजी म्हेत्रे तपास करीत आहेत.
याप्रकरणी मंदार आबासाहेब बर्गे याने कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

..मगच अंत्यसंस्कार..
शंभूचा मृत्यू झाल्याचे समजताच शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. भल्या सकाळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तोपर्यंत शंभूचा मृतदेह घेऊन आलेली रुग्णवाहिका बर्गे कुटुंबीय व मित्रांनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर आणली. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करा, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. ‘याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे, इतर संशयितांचा शोध सुरू आहे, त्यांना लवकरच अटक करू,’ असे पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे व पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांनी सांगत जमावाला शांत केले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात शंभू बर्गे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Strain in Koregaon after the murder of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.