साताऱ्यात तणाव; रामराजेंकडे निघालेल्या उदयनराजेंना अडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:02 AM2018-06-27T06:02:56+5:302018-06-27T06:03:04+5:30
खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे दोन नेते मंगळवारी येथील विश्रामगृहावर समोरासमोर भिडण्याची शक्यता होती.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे दोन नेते मंगळवारी येथील विश्रामगृहावर समोरासमोर भिडण्याची शक्यता होती. रामराजे ज्या सूटमध्ये बसले होते, तिकडे बाह्या वर करून निघालेल्या उदयनराजेंना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी वेळीच रोखले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांसमोर राग व्यक्त करून उदयनराजे निघून गेले.
सातारा जिल्हा बँकेतील बैठक संपल्यानंतर रामराजे सायंकाळी विश्रामगृहातील ‘अजिंक्यतारा’ या सूटमध्ये बसले होते. याची माहिती मिळताच सायंकाळी पाचच्या सुमारास उदयनराजे हेही विश्रामगृहावर आले. त्यांनी थेट ‘प्रतापगड’ सूट गाठला. ‘उदयनराजे येणार व तणाव वाढणार...’ हे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी विश्रामगृहावर मोठा पोलीस बंदोबस्त आधीच ठेवला होता.
उदयनराजे ‘प्रतापगड’ सूटमधून उठून बाहेर आले. रामराजे ज्या सूटमध्ये बसले होते, तिकडे जायला निघाले तेव्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुत्सद्देगिरी दाखवत पुढे होऊन उदयनराजेंशी शेक हँड करत गप्पा मारायला सुरुवात केली. यावेळी उदयनराजे काही पुटपुटत होते. ‘कसला भगीरथ... याने जिल्ह्याची वाट लावली...,’ असे बोलतच उदयनराजे पुन्हा आपल्या वाहनात जाऊन बसले.
दरम्यान, काही दिवसांपासून रामराजे व उदयनराजे या दोन नेत्यांत वाक्युद्ध सुरू आहे. एकमेकांवर वैयक्तिक टीका करण्यावर दोघांचाही भर असल्याने जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. काहीही घडू शकते, हे लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक दक्षता घेतली आहे. विशेषत: सातारा व फलटण या दोन शहरांत तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे निघून गेल्यानंतरही विश्रामगृहावर मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता. रामराजे निघून गेल्यानंतरच पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला.
योग्य वेळी बोलेन - रामराजे
काही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी रामराजेंची भेट घेऊन मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘मी योग्य वेळी बोलेन,’ इतकंच रामराजेंनी स्पष्ट केलं.
संदीप पाटील यांची मुत्सद्देगिरी
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुत्सद्देगिरी दाखविल्याने विश्रामगृहावर काही अघटित घडले नाही. त्यांनी योग्य वेळी बंदोबस्त लावला, तसेच उदयनराजेंशी चर्चा केली, तणाव निवळल्याची चर्चा विश्रामगृहावर सुरू होती.