एसटीच्या चाकाखाली बाईक अडकून उडाल्या ठिणग्या; बससह दुचाकीस्वार जळून खाक

By दत्ता यादव | Published: August 14, 2024 08:59 PM2024-08-14T20:59:52+5:302024-08-14T21:03:18+5:30

प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसने अचानक पेट घेतल्याने एकच गोँधळ उडाला होता.

Strange accident in Satara Bikers burn with buses and bikes | एसटीच्या चाकाखाली बाईक अडकून उडाल्या ठिणग्या; बससह दुचाकीस्वार जळून खाक

एसटीच्या चाकाखाली बाईक अडकून उडाल्या ठिणग्या; बससह दुचाकीस्वार जळून खाक

सातारा  : पुण्याहून पलूसकडे जाणाऱ्या एसटीच्या पुढील चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी काही अंतर डांबरावर घासत गेली. त्यामुळे स्पार्किंग झाल्याने या आगीत एसटीसह दुचाकीस्वार जळून खाक झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता भुईंज, ता. वाई येथे घडली.

पुण्याहून पलूसकडे एसटी निघाली होती. एसटीमध्ये प्रवाशी खचाखच भरले होते. महामार्गावरील भुईंज येथील विरंगुळा पेट्रोल पंपाजवळ एसटी आल्यानंतर अचानक पुढील डाव्या बाजूच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकला. डांबरावर दुचाकी घासत गेल्याने स्पार्किंग झाले. त्यामुळे दुचाकीला आग लागली. एसटीच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकला होता. त्यालाही बाहेर निघता आले नाही. एसटीलाही आग लागल्याचे समजताच चालक व वाहकाने प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. घाईगडबडीत प्रवाशांच्या बॅगा एसटीतच राहिल्या. प्रवाशांनी खिडकीतून, दरवाजातून उड्या मारून आपला जीव वाचवला. सर्व प्रवासी व चालक, वाहकाने खाली उतरून अग्निशमन दलाला याची माहिती दिली. पाहता पाहता आगीने राैद्ररूप धारण केले. काही क्षणातच संपूर्ण एसटी आगीच्या भक्षस्थानी पडली. वाई नगरपरिषद व भुईंज कारखाना येथून अग्निशमश दलाची गाडी घटनास्थळी आली. त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत एसटीसह दुचाकीस्वारही जळून खाक झाला. त्या मृत दुचाकीस्वाराची रात्री उशिरापर्यंत पोलिसांना ओळख पटली नव्हती. भुईंज पोलिस या अपघाताचा तपास करीत आहेत.

पोलिस भरतीसाठी गेलेल्या तरूणीची कागदपत्रे जळाली

पोलिस भरतीहून एक तरूणी पुण्याहून कऱ्हाडला निघाली होती. एसटीला आग लागल्यानंतर तिची बॅग एसटीमध्येच राहिली. त्या बॅगमध्ये मूळ शैक्षणिक कागदपत्रे होती. ही कागदपत्रे जळून खाक झाली. अग्नीशामक यंत्रणा लवकर आली असती तर माझी कागदपत्रे वाचली असती, अशी संतप्त भावना त्या तरूणीने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.  

Web Title: Strange accident in Satara Bikers burn with buses and bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.