विधानसभा निवडणूक: सातारा जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जुलैमध्ये शरद पवार आढावा घेणार

By नितीन काळेल | Published: June 24, 2024 07:32 PM2024-06-24T19:32:54+5:302024-06-24T19:34:21+5:30

सात मतदारसंघाबाबत रणनिती

Strategy of Nationalist Congress Sharad Chandra Pawar party in seven constituencies in Satara in the upcoming assembly elections | विधानसभा निवडणूक: सातारा जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जुलैमध्ये शरद पवार आढावा घेणार

विधानसभा निवडणूक: सातारा जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जुलैमध्ये शरद पवार आढावा घेणार

सातारा : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार खलबते सुरू आहेत. त्यामुळे याचे लाेण जिल्हास्तरावरही आले असून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यंदाही साताऱ्यातील सात मतदारसंघात उतरण्याबाबत रणनिती सुरू आहे. यासाठी जुलै महिन्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आढावा घेणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत साताऱ्याततरी महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ठरणार आहे.

लोकसभा निवडणूक संपली आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यात येत आहे. राज्यात महायुतीत जागा मिळविण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झालीय. दावे- प्रतिदावे सुरू आहेत. तसेच महाविकास आघाडीतही खलबते सुरू झाले आहेत. पण, याला मूर्त स्वरुप हे आघाडी आणि युतीतील तीन पक्षनेत्यांच्या बैठकीतच येणार आहे. राज्यातील जागावाटप होईल तेव्हा होईल. पण, सध्या जिल्हास्तरावर चाचपणी, रननिती करण्यात येऊ लागली आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रीय काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी होती. पण, उध्दवसेनेमुळे आता तिघे झाले आहेत. सातारा जिल्ह्यात सध्या काॅंग्रेसचा एकच आमदार आहे. तर भाजप, शिंदेसेनेचे प्रत्येकी दोन, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एक आणि अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाततरी पवार गटाकडे सर्वाधिक जागा राहणार आहेत. मागील निवडणुकीत पक्षाने कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ वगळता सात ठिकाणी उमेदवार उभे केलेले. त्यातील तिघेजण विधानसभेत पोहोचले. आताही राष्ट्रवादीकडून सात ठिकाणांची मागणी होऊ लागली आहे.

कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदासंघात माजी मंत्री बाळासाहेब पाटील हेच उमेदवार असणार आहेत. तर पाटणमध्ये सत्यजित पाटणकर हे तिसऱ्यांदा मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात उतरु शकतात. फलटण मतदारसंघातील आमदार दीपक चव्हाण हे अजित पवार गटात आहे. त्यामुळे याठिकाणी पवार यांच्याकडे सध्यातरी चेहरा नाही. उमेदवारी कोणाला मिळते याकडे लक्ष असणार आहे. माणमध्ये प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप यांची तयारी आहे. तरीही हा मतदारसंघ उद्धवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेखर गोरे हे आघाडीचे उमेदवार ठरु शकतात.

सातारा विधानसभेची मागील निवडणूक दीपक पवार यांनी लढविली होती. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा पवार गटाकडून आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत निकराची लढाई होऊ शकते. वाई मतदारसंघातील आमदार मकरंद पाटील हे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे पवार गटाला मतदारसंघ मिळाल्यास वाईतून उमेदवार कोण हे सध्यातरी अनिश्चित आहे.

कोरेगाव मतदारसंघाचे नेतृत्व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केले आहे. मागील निवडणुकीत पराभूत झाले. यावेळी ते कोरेगाव की सातारा-जावळीतून लढणार यावर निवडणूकीचा रंग ठरणार आहे. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण करतात. त्यामुळे दक्षिण मतदारसंघ काॅंग्रेसकडेच राहील. तरीही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ठरणार हे निश्चीत आहे.

उध्दवसेना एक का दोन ठिकाणी लढणार !

महाविकास आघाडीत उध्दवसेना आली असलीतरी जिल्ह्यातील दोन्ही आमदार शिंदेसेनेत सामील आहेत. तरीही उध्दवसेना पाटण मतदारसंघावर नक्कीच दावा ठोकू शकते. तसेच माण मतदारसंघातही उध्दवसेनेची ताकद आहे. शेखर गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माढा मतदारसंघ उमेदवाराचे मनापासून काम केले. त्यामुळे मतदारसंघ सेनेकडे जाण्याची शक्यता आहे. कोरेगाव मतदारसंघात उध्दवसेनेकडे ताकदीचा उमेदवार नाही. तरीही जिल्ह्यातील किमान एक-दोन मतदारसंघ आघाडीत उद्धवसेनेकडे जाण्याचा अंदाज आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. यंदाही आमची सात जागांची मागणी राहणार आहे. तरीही महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकीतील निर्णय सर्वांना मान्य असेल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जुलै महिन्यात सातारा दाैऱ्यावर येऊन जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊ शकतात. - राजकुमार पाटील, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काॅंग्रेस

Web Title: Strategy of Nationalist Congress Sharad Chandra Pawar party in seven constituencies in Satara in the upcoming assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.