स्ट्रॉबेरी अन् हळद बनली ‘सातारी ब्रॅण्ड’!

By admin | Published: July 2, 2015 11:43 PM2015-07-02T23:43:17+5:302015-07-02T23:43:17+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : मधुबन मध, सातारी घनसाळ तांदूळ, खपली गहू, राजम्याची चवच न्यारी

Strawberry and turmeric became 'Satari brand'! | स्ट्रॉबेरी अन् हळद बनली ‘सातारी ब्रॅण्ड’!

स्ट्रॉबेरी अन् हळद बनली ‘सातारी ब्रॅण्ड’!

Next

सागर गुजर - सातारा  -अभ्यासपूर्ण शेतीचे महत्त्व पटवून देत शेतकऱ्यांमध्ये प्रयोगशीलतेची चुनुक निर्माण करणाऱ्या सातारा प्रशासनाने आता अस्सल सातारी उत्पादनांना हक्काचे विक्री केंद्र सुरु करण्याच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या काही कालावधीत सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्ट्रॉबेरी, दिशा हळद, मधुबन मध, सातारी घनसाळ तांदूळ, खपली गहू या देशभर नावाजलेल्या उत्पादनांची विक्री केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रशासनाच्या या पाठबळामुळे शेतकऱ्यांना उत्पादन घेण्यासाठी आणखी बळ मिळणार आहे. कृषी खात्याच्या आत्मा विभागामार्फत शेतीशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, लागवडीबाबतच्या सूचना, पीक प्रात्यक्षिके असे विविध पातळीवरील सहयोगासोबतच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार उत्पादनांना
बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले गेले.
आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे याबाबत ‘लोकमत’ ला माहिती देताना म्हणाले, ‘सातारच्या मातीतील लुप्त पावत चाललेल्या बियाणांना उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. कसदार व पौष्टिक असणारा खपली गव्हाचे उत्पादन लुप्त होण्याच्या मार्गावर होते. दोन वर्षांपूर्वी आगरकर संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे दुष्टचक्र भेदले. खपली गहू मागणी असूनही पुरेशा प्रमाणात बाजारपेठेत मिळत नसल्याचे चित्र होते. नागठाणेत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते बिजोत्पादनाचे लाँचिंग आम्ही केले. यानंतर फलटण तालुक्यातील फडतरवाडीच्या शेतकऱ्यांनी ४00 पोती खपली गव्हाचे उत्पादन घेतले. ७0 रुपये किलो दराने खपली गहू विकला जातो.’
वाई, कोरेगाव, खटाव या तालुक्यांतील मोेजक्या क्षेत्रावर राजमा घेवडा घेतला जात होता. मधल्या काळात राजम्याच्या नावाखाली चीनचा घेवडा बाजारपेठेत आणला गेला होता. २0 रुपये किलो दराने हा राजमा विकला गेल्यानंतर कोरेगावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत कोरेगावचा राजमा या नावाने वाघा घेवड्याचे ब्रँडिंग करण्यात आले. वाघा घेवड्याला भौगोलिक मानांकनही मिळाले आहे. सातारी घनसाळ तांदूळही बाजारपेठेत चांगला भाव खात आहे. महाबळेश्वर येथील मध संचालनालयाचे संचालक जी. बी. जगताप यांनीही मधाच्या उत्पादनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘मधमाशी पालकांना मोठा रोजगार उपलब्ध करुन देण्यात आम्हाला यश आले आहे. मधूबनचे मध हे १00 टक्के शुध्द आहे. जंगलातील लोकांकडून ३५0 रुपये इतक्या दराने आम्ही मध विकत घेतो. संस्थेच्या नफ्यातील १५ टक्के रक्कम आम्ही उत्पादकांना देतो.’
खपली गहू, दिशा हळद, सातारी घनसाळ तांदूळ, राजमा घेवडा, मधूबन मध या अस्सल सातारी उत्पादनांचे विक्री केंद्र साताऱ्यात तयार करण्यात येणार आहे. बचतगटांच्या माध्यमातून ही विक्री केली जाईल. बचतगटाच्या नेटवर्कचा यासाठी चागंला उपयोग करुन घेता येणार आहे.

भुर्इंजची दिशा हळद
साताऱ्याचे हवामान हळद उत्पादनासाठी अनुकुल आहे. आत्माअंतर्गत भुर्इंज परिसरातील २0 शेतकरी गट एकत्र येऊन हळद उत्पादन सुरु करण्यात आले. एका वर्षात ७ हजार किलो उत्पादन या हळदीचे झाले. दिशा हळद या नावाने केंद्र शासनाकडून या हळदीचे ब्रँडिंग करण्यात आले. आता याच नावाने पॅकिंगमध्ये येणाऱ्या हळदीला प्रचंड मागणी आहे.
सातारी घनसाळ
आजरा घनसाळच्या धर्तीवर सातारी घनसाळ तांदूळ घेतला जात आहे. सातारा, कऱ्हाड, पाटण, वाई या पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये २00 शेतकऱ्यांनी १00 एकरवर हे पीक घेतले होते. आत्माअंतर्गत या तांदळाचे सातारी घनसाळ तांदूळ या नावाने ब्रँडिंग केले गेले. तब्बल ७0 रुपये किलो दराने तांदूळ बाजारपेठेत विकला जात आहे.

राजमा घेवडा
कोरेगाव तालुक्यातील देऊर गावच्या आसपासच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन राजमाचे उत्पादन घेतले. उत्तर भारतात राजम्याला मोठी मागणी आहे. मागील महिन्यात राजमा उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीला जाऊन पे्रझेंटेशन दिले. राजम्याला भौगोलिक मानांकनाचा दर्जा मिळाला आहे. राजम्याचेही ब्रँडिंग केल्याने निर्यातीसाठी विविध देशांचे दरवाजे खुले होणार आहेत.


मधुबन मध
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने मध संचालनालयाच्या माध्यमातून महाबळेश्वर, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील जंगल भागातील मधुमक्षीपालकांना उद्योग निर्माण केला आहे. मधुबन या नावाने राज्य शासनाने महाबळेश्वर तयार केलेल्या गव्हाला अ‍ॅगमार्क मिळाला आहे.
खपली गहू
खपली गव्हाची जात लुप्त होण्याच्या मार्गावर असतानाच आत्माअंतर्गत शेतकऱ्यांचे प्रबोधन करुन याचे बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले होते. सातारा, महाबळेश्वर तालुक्यांमध्ये याचे बियाणे तयार करण्यात आले. सुरुवातीला १0५ एकरावर १ हजार ७३७ क्विंटल उत्पादन घेतले. गतवर्षी १ कोटी ३१ लाख रुपयांची उलाढाल जिल्ह्यामध्ये झाली.

Web Title: Strawberry and turmeric became 'Satari brand'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.