पुस्तकाच्या गावात स्ट्रॉबेरी महोत्सव : राज्यातून आलेल्या पर्यटकांसाठी मोठी संधी, भिलारमध्ये गर्दी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:03 AM2018-03-30T00:03:33+5:302018-03-30T00:03:33+5:30
पाचगणी : भिलारच्या तांबड्या मातीतील लालबुंद बदामी आकाराच्या स्ट्रॉबेरीची अवीट गोडी चाखण्याची नामी संधी पर्यटकांना स्ट्रॉबेरी महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे
पाचगणी : भिलारच्या तांबड्या मातीतील लालबुंद बदामी आकाराच्या स्ट्रॉबेरीची अवीट गोडी चाखण्याची नामी संधी पर्यटकांना स्ट्रॉबेरी महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. पुणे, कोल्हापूर, कोकण, मुंबईसह परराज्यातून दाखल झालेले पर्यटक शेतावर जाऊन स्ट्रॉबेरी खात आहेत.
स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशन व भिलार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी महोत्सव भरवला आहे. महोत्सवाचा गुरुवारी दुसरा दिवस होता. यानिमित्त सकाळी भिलार रन मॅरेथॉन आयोजित केली होती. त्याला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. यामध्ये पाच किलोमीटर, तीन किलोमीटरच्या स्पर्धा घेण्यात आल्या. पुरुष गट, पुरुष महिला गट, मुला-मुलींचा छोटा गट यामध्ये स्पर्धा झाली. यात पाच किलोमीटरमध्ये मांढरदेव अॅथलेटिक सेंटरच्या युवकांनी प्रथम क्रमांक पटकविला.
यामध्ये तीन किलोमीटरमध्ये पुरुष गटात दिलीप जामदार, अभिजित पाटील, रवींद्र होगडे. महिलांमध्ये तृप्ती पाटील. तर पाच किलोमीटरमध्ये पुरुषामध्ये सुशांत जेधे, हरिदास शिंदे, प्रतीक उंबरकर. महिलांमध्ये आशा जोशी, विनीता प्रसाद अनुक्रमे पहिला, दुसरा क्रमांक पटकविला. छोट्या गटात मुलांमध्ये संजोग सणस, प्रेम भिलारे, ऋषिकेश गावडे. मुलींमध्ये ऋतुजा सपकाळ, रुपाली ढेबे, करुणा पाटील यांनी क्रमांक पटकाविले.या स्पर्धेत पर्यटकांसह स्थनिक, तसेच सातारा, वाई, पाचगणी, मांढरदेव येथील स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यानंतर पर्यटकांनी शेतावर जाऊन मनोसोक्त स्ट्रॉबेरीची आनंद मिळविला. पुस्तक प्रेमी पर्यटकांनी वाचनाचाही आनंद घेतला.
सलग सुट्यांमुळे वाढणार गर्दी
पुस्तकांचं गाव पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. जागोजागी स्वागत फलक, आकर्षक कमानी लक्ष वेधून घेत आहेत. हा महोत्सव१ एप्रिलपर्यंत पर्यटकांसाठी खुला राहणार आहे.
गुरुवारी महावीर जयंती, शुक्रवारी गुड फ्रायडे, शनिवार व रविवार अशा जोडून सुट्या आल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.