दुष्काळी मातीला स्ट्रॉबेरीचा लळा!
By Admin | Published: October 26, 2015 08:47 PM2015-10-26T20:47:06+5:302015-10-27T00:21:38+5:30
केल्याने होत आहे रे : सर्कलवाडीतील तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
हवामानानुसार पीक व्यवस्थापन अशी परस्थिती असलेल्या सातारा जिल्ह्यात तालुकानिहाय वेगवेगळ्या पिकांची लागवड केली जाते. मात्र काळानुरूप आता पीक परिस्थिती बदलली जात आहे. लालचुटूक स्ट्रॉबेरी म्हटलं की, केवळ महाबळेश्वर, पाचगणीचं नाव घेतलं जात होतं. मात्र, कोरेगाव तालुक्यातील दुष्काळी सर्कलवाडीतील माळरानावर स्ट्रॉबेरी फुलविण्याचा विडा उचलेला युवा शेतकरी अक्षय अनपट स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यात यशस्वी झाला आहे. कोरेगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले सर्कलवाडी गाव जिल्ह्यात शेती व्यवसायाबाबत आदर्श भूमिका बजावत आहे. शेतीतील नवनवीन प्रयोग राबविणाऱ्या याच गावातील अक्षय अनपट या पदवीधारक युवा शेतकऱ्याने आपल्या वडिलार्जित शेतीत लक्ष घालत स्ट्रॉबेरीची उत्तम शेती करण्याचा संकल्प केला आहे.पद्वीनंतर खरंतर नोकरी करण्याच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीत लक्ष घालण्याचा निर्णय अक्षय यांनी घेतला. त्यांनी चौदा एकर क्षेत्रात डाळिंब, द्राक्ष, कलिंगड, सिमला मिरची, स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेत आहे. अभ्यासूवृती, दूरदृष्टीच्या जोरावर हा तरुण शेतीचे उत्तम नियोजन करत आहे. या सर्व क्षेत्रासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी त्याने स्वत:च्या शेतात जवळपास २७ गुंठ्यांत शेततळ तयार केले आहेत. हे शेततळ पावसाळी परिस्थितीत तो भरत असतो. या शिवाय सर्वच पिकासाठी ठिबक सिंचनची जोडणी केल्याने पाण्याची मोठी बचत होत आहे.
सद्य:स्थितीत त्याने चौधरवाडी रोडनजीक ३० गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. यासाठी लागणारी सर्व रोपेही त्याने स्वत:च्या मदरप्लँटमध्येच तयार केली आहेत. यामुळे रोपांसाठी लागणारा लाखोंचा खर्च त्याने वाचविला आहे. एकरी किमान दहा टन उत्पन्नाचे उद्दिष्टे ठेवले असून, ५० रुपये किलो हा बाजारभाव जरी या मालास मिळाला तरी एक एकरात स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून किमान पाच लाखांचा नफा त्याला अपेक्षित आहे.
शेती व्यवस्थापनात रासायनिक खतांचा वापर कमी करून जास्तीतजास्त सेंद्रिय खतांचा वापर करणे ही काळाची गरज राहणार आहे. याशिवाय सर्वच पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर केल्यास पिकासाठी पाणी कमी प्रमाणात लागते, असा त्याचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे पिकासोबत तणांचा नायनाट होतो, याशिवाय पिकांची भांगलण वाचते, असे अक्षयचे मत आहे. महाबळेश्वर-पाचगणीच्या थंड वातावरणामुळे आॅक्टोबरमध्ये लागवड केलेली स्ट्रॉबेरी परिपक्व होण्यास वेळ लागतो. याऊलट कोरेगाव तालुक्यात असलेले तापमान अधिक असल्याने आपल्या भागातील स्ट्रॉबेरी लवकर परिपक्व होते. परिणामी पीक लवकर बाजारात येते. मागील दोन वर्षांत या भागात वाढलेल्या क्षेत्रामुळे स्ट्रॉबेरीचा बाजार भाव कमी झाला आहे.--संजय कदम
महाबळेश्वरची मक्तेदारी मोडीत
युवकांनी नोकरी मिळविण्यापेक्षा असणाऱ्या शेतीत प्रामाणिक प्रयत्न केल्यास निश्चितपणे शेतीतून चांगला पैसा मिळतो, हा माझा विश्वास आहे. स्ट्रॉबेरीवर केवळ महाबळेश्वर, पाचगणीचा मक्ता होता. तो मोडीत काढल्याचा आनंद वाटतो आहे. हा प्रयोग आहे. भविष्यात आणखी कष्ट घेण्याची तयारी आहे.
- अक्षय अनपट, शेतकरी