मातीशिवाय उगवतेय स्ट्रॉबेरी!
By admin | Published: January 10, 2016 12:42 AM2016-01-10T00:42:14+5:302016-01-10T00:42:14+5:30
हायटेक उपक्रम : ‘हायड्रोफोनिक’ तंत्रज्ञानाकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल
सचिन काकडे ल्ल सातारा
महाबळेश्वरच्या तांबड्या मातीत पिकणारे फळ म्हणजे स्ट्राबेरी. जमिनीत लागवड न करताही स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन घेणे शक्य झाले आहे. ‘हायड्रोफोनिक’ या तंत्रज्ञानाचा वापर करून महाबळेश्वर तालुक्यातील शेतकरी या पिकाचे दुपटीने उत्पादन घेत आहे. विशेष म्हणजे, स्ट्रॉबेरीसाठी हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा राज्यात सर्वप्रथम प्रयोग भिलार येथे करण्यात आला.
महाबळेश्वर तालुक्यात यंदा सुमारे तीन हजार एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. तर जवळपास १ हजार ७०० शेतकरी या शेतीकडे वळले आहे. आजपर्यंत केवळ तांबड्या मातीतच स्ट्रॉबेरीची लागवड करून उत्पादन घेतले जात होते. मात्र, आता हायड्रोफोनिक या तंत्राच्या वापराने स्ट्रॉबेरीची जमिनीत लागवड न करताही उत्पादन घेण्यात येत आहे.
हायड्रोफोनिक म्हणजे, ‘स्ट्रॉबेरी रोपांची लागवड जमिनीत न करता कुंड्या अथवा ट्रफमध्ये केली जाते. लागवड करताना त्यामध्ये मातीऐवजी कोकोपीठ (नारळाची भुकटी) टाकली जाते. यानंतर रोपांना आवश्यक असणारी मूलद्रव्ये ज्यामध्ये एनपीके (प्रायमरी), कॅल्शिअम, मॅग्नेशिअम सल्फर (सेंकडरी) तसेच लोह, बोरॉन, थ्रिंक, कॉपर, अमोनिअम, मॉली या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पाण्याच्या माध्यमातून पूर्तता केली जाते. या तंत्रज्ञानामुळे ९० टक्के पाण्याची बचत होते. या तंत्रज्ञानाच्या स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी गुंठा ४० हजार रुपये इतका खर्च येतो.
हायड्रोफोनिक स्ट्रॉबेरीचा रंग, चव व सर्व गुणधर्म हे जमिनीतील स्ट्रॉबेरीप्रमाणेच असतात. मात्र, या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात दुपटीने वाढ होत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नही वाढत आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारे ठरत आहे.
तीन वर्षांत १७५ पॉलिहाउस
- महाबळेश्वर तालुक्यात गेल्या तीन वर्षांमध्ये १७५ पॉलिहाउस उभारण्यात आले आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना अनुदानही दिले आहे. पॉलिहाउसच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीच्या एका रोपापासून सुमारे ५० नव्या रोपांची शाखीय वाढपद्धतीने निर्मिती केली जाते. तसेच अतिवृष्टीपासून रोपांचे संरक्षणही होते. पॉलिहाउसच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे.
पाच एकर क्षेत्रात लागवड
हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वीट चार्ली, विंटर डाऊन, कॅमारोजा, नाभिला, रानिया या जातींच्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, यांना बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. भिलार येथील किसन भिलारे यांनी राज्यात सर्वप्रथम या तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले. प्रारंभी दोन गुंठे क्षेत्रात केलेला हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर तालुक्यातील २० शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान अवलंबविले. यंदा ५ एकर क्षेत्रात हायड्रोफोनिक स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे.
३ हजार एकर
स्ट्रॉबेरीचे एकूण लागवड क्षेत्र
१ हजार ८००
स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी :
८७ टक्के उत्पादन
देशात सर्वाधिक