Satara: अतिपावसाचा फटका; स्ट्रॉबेरीचे क्षेत्र घटणार, नर्सरी रोपाला रोगाचा प्रादूर्भाव 

By नितीन काळेल | Published: September 7, 2024 07:16 PM2024-09-07T19:16:47+5:302024-09-07T19:18:13+5:30

शेतकरी पाऊस उघडीपीच्या प्रतीक्षेत 

Strawberry production hit in Satara district due to excessive rains | Satara: अतिपावसाचा फटका; स्ट्रॉबेरीचे क्षेत्र घटणार, नर्सरी रोपाला रोगाचा प्रादूर्भाव 

Satara: अतिपावसाचा फटका; स्ट्रॉबेरीचे क्षेत्र घटणार, नर्सरी रोपाला रोगाचा प्रादूर्भाव 

सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरूच असून स्ट्राॅबेरीचे उत्पादन घेणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातही अति पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे सध्यातरी स्ट्राॅबेरीची लागण १५ दिवस पुढे गेली आहे. तसेच वाई, जावळी आणि कोरेगाव तालुक्यातही पाऊस अधिक झाल्याने नर्सरीतील स्ट्राॅबेरी रोपांनाही रोगाचा प्रादूर्भाव होऊ लागलाय. यामुळे यावर्षी स्ट्राॅबेरीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. 

महाबळेश्वर हे जागितक पर्यटनस्थळ आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्राॅबेरीचे उत्पादन घेण्यात येते. येथील स्ट्राॅबेरीची परदेशात निर्यात होते. तसेच देशातील हैद्राबाद, अहमदाबाद, बडोदा, दिल्ली, कोलकाता, चेन्नईलाही स्ट्राॅबेरी पाठिवण्यात येते. तर महाबळेश्वरला येणारे पर्यटक स्ट्राॅबेरी खाल्ल्याशिवाय पर्यटन पूर्ण झाले असे मानत नाहीत. त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्राॅबेरीला अधिक मागणी असते. पण, यावर्षी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी लागणीला वेग आला नाही. अति आणि सध्याही सुरू असलेल्या पावसामुळे लागण किमान १५ दिवस पुढे गेलेली आहे. 

महाबळेश्वर तालुक्यात दरवर्षी साधारणपणे ५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबरपर्यंत स्ट्राॅबेरीची लागण करण्यात येते. यासाठी जून महिन्यात परदेशातून रोपे आणण्यात येतात. जिल्ह्यातील वाई, जावळी आणि कोरेगाव तालुक्यात नर्सरीत रोपे तयार करुन नंतर लागण होते. रोपांची लागण झाल्यानंतर दोन महिन्यांपासून फळाला सुरूवात होते. पुढे सहा महिने स्ट्राॅबेरीची एक दिवसा आड तोडणी होते. पण, यावर्षी महाबळेश्वर तालुक्यात अति पाऊस झाला आहे. यामुळे लागण कधी वेग घेणार हे एक कोडेच आहे. त्यातच नर्सरीतील स्ट्राॅबेरी रोपांना रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पाऊस आणखी वाढल्यास आणखी रोग पसरणार आहे. त्यामुळे लागणीसाठी रोपांची कमतरता भासू शकते. परिणामी क्षेत्रातही घट होण्याचा अंदाज आहे. 

  • महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्राॅबेरी क्षेत्र : सुमारे ३ हजार एेकर
  • स्ट्राबेरी लागण गावे : ५२
  • वार्षिक उलाढाल - २२५ ते २५० कोटी

Web Title: Strawberry production hit in Satara district due to excessive rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.