दिवसभर रस्त्यात... रात्री गोठ्यात!

By Admin | Published: July 12, 2015 09:51 PM2015-07-12T21:51:03+5:302015-07-12T21:51:03+5:30

सांगा रस्ता कुणाचा? : मोकाट अन् पाळीव जनावरांचा शहरातील रस्त्यांवर वावर; वाहतुकीला अडथळा, अपघाताचीही शक्यता

In the street all day ... at night in the dump! | दिवसभर रस्त्यात... रात्री गोठ्यात!

दिवसभर रस्त्यात... रात्री गोठ्यात!

googlenewsNext

प्रदीप यादव - सातारा -शहरातील रस्त्यांना लागलेले खड्ड्यांचे ग्रहण सुटता सुटेना. छोट्या-मोठ्या कामांसाठी नेहमी रस्ते खोदले जातात, त्यामुळे खड्डेमय रस्त्यावरील प्रवास सातारकरांच्या अंगवळणी पडला आहे. मात्र, आता नवीनच समस्या निर्माण झाली असून मोकाट अन् पाळीव जनावरे दिवसभर शहरातील रस्तोरस्ती भटकत असतात. परिणामी वाहतुकीला अडचण निर्माण होण्याबरोबरच जनावरांच्या जिवालाही धोका पोहोचू शकतो.
सातारा शहराचा विकास होत असताना पाळीव जनावराना फिरण्यासाठी आता जागा उरलेली नाही. शहराच्या बाहेर जनावरे चरावयास नेताना मोठी कसरत करावी लागते. राजपथ, कर्मवीर पथावरूनच जनावरे हाकत न्यावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही रोजची कटकट बनली आहे. गाय, म्हशीचे कळप शहरातील रस्त्यांवरून जाताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडते. जनावरे रस्त्यातच बैठक मारत असल्यामुळे मोठ्या वाहनांना पुढे जाणे मुश्किल होते. अनेकदा दुचाकी जनावरांना धडकतात. गाड्या घसरण्याबरोबरच जनावरांनाही दुखापत होण्याची शक्यता असते.
राजपथावर तर मोकाट जनावरांचे कळप मोकाट फिरत असतात. त्यांना मालक नसल्यामुळे ती कुठेही फिरत असतात. रस्त्याकडेला वाढलेले गवत, कचराकुंड्यांमध्ये टाकलेले अन्नपदार्थ, फळे, खराब भाजीपाला खाण्यासाठी मोकाट जनावरांबरोबरच पाळीव जनावरेही गर्दी करतात अन् वाहतुकीचा बोजवारा उडतो.
कर्मवीर पथावरून बसस्थानकाकडे चरावयास जाणारी जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असतात. विशेष म्हणजे ही जनावरे पाळीव आहेत. मात्र, त्यांचा मालक जनावरे सोडून देतो. दिवसभर ही जनावरे रस्त्यावर भटकून चरतात आणि दिवस मावळतीला गेला की आपल्या गोठ्यात जाऊन विसावतात. जनावरांच्या या सवयी मालकांना माहीत असल्यामुळे ते निर्धास्त राहतात. जनावरांच्या मागे फिरावे लागत नसल्यामुळे मालक निर्धास्त राहतात, मात्र वाहनचालकांची मोठी तारांबळ उडते.
पशुधन हे शेतकऱ्यांसाठी जीव की प्राण असते. शहरातील रस्त्यांवरून जनावरे नेताना मालकांनी स्वत: त्यांच्या बरोबर असणे गरजेचे आहे. यामुळे जनावरे रस्त्यात न घुटमळता ती मोकळ्या जागेवर पोहोचतील आणि होणारे अपघात टळतील.

जनावरांच्या जिवालाही धोका
काही दिवसांपूर्वी राजपथावर पोलीस करमणूक केंद्रासमोर भटक्या गायींचा कळप रस्त्यावरून जात होता. दोन गायी रस्त्यातच उभ्या होत्या. सकाळी साडेअकराची वेळ असल्यामुळे वाहनांची वर्दळ जास्त होती. समोरून बस आली अन् रस्त्यात उभ्या असलेल्या एका गायीच्या जवळून गेली. गायीने थोडी जरी हालचाल केली असती तरी तिच्या पाठीचे हाड मोडले असते किंवा बसच्या धक्क्याने खाली पडून चाकाखाली येऊ शकली असती.

Web Title: In the street all day ... at night in the dump!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.