पालिकेच्या पथदिव्यांचा खळऽऽखट्याक!
By admin | Published: April 25, 2017 10:48 PM2017-04-25T22:48:28+5:302017-04-25T22:48:28+5:30
कऱ्हाडातील पथदिव्यांचा ‘उजेड’ : डागडुजीअभावी झाली दुरवस्था; अनेक ठिकाणचे पदपथ, दुभाजकासह रस्तेही अंधारात
कऱ्हाड : शहरातील परिसराबरोबर मुख्य मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई असावी म्हणून वीजवितरण कंपनीने शहरातील रस्त्यांसह अंतर्गत भागात विद्युत खांब व ट्रान्सफॉर्मर उभारले व त्यातून वापरल्या जाणाऱ्या लाईटचे बिल भरण्याची जबाबदारी पालिकेवर टाकली. पालिकेकडूनही दर महिन्याला विजेचा कर भरला जातो. एकीकडे मोठ्या प्रमाणात वीज कर भरत असताना दुसरीकडे मात्र, या वीजखांबांना काचांचे संरक्षण नसल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या खांबांची आज डागडुजीअभावी दुरवस्था होत चालली असल्याचे दिसून येत आहे. शहरात सध्या गंजलेल्या पोलवरील तुटलेल्या काचेतून वीजवितरण व पालिकेच्या ‘बिन’कामाचा उजेड पडत आहे.
मुख्य चौकासह अंतर्गत पेठांमध्ये वीजवितरण व पालिकेतर्फे मर्क्युरी तसेच फ्युजबॉक्स, ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. त्याची नियमित देखभाल घेणे गरजेचे असतानाही त्याकडे पालिकेकडून मात्र, दुर्लक्ष केले जात आहे.
उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा नाका, जनता बँकेसमोरील चौक, मंगळवार पेठ, कन्याशाळा, नवीन भाजी मंडई परिसर, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, कृष्णामाई घाट परिसर, शुक्रवार पेठ अशा पेठांसह मुख्य रस्त्यांवर शेकडो बसविण्यात आलेल्या मर्क्युरीवरील दिव्यांपैकी आज काहींची दुरवस्था झाली आहे.
शहरात रस्त्याकडेला लावण्यात आलेल्या मर्क्युरीवरील काचा फुटल्या असल्याने त्यातील बल्ब हा लवकर खराब होतो.
तसेच पक्ष्यांच्या जिवासही यापासून धोका संभवतो. या मर्क्युरीवरील लावण्यात आलेल्या बल्ब व मर्क्युरीची नियमित देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष न दिले गेल्यामुळे त्यावर धुरळा तसेच पावसाचे पाणी शिरल्यास बल्ब खराब होतो. यामुळे नुकसान होण्याचीही शक्यता असते.
शहरात आज अनेक ठिकाणी धोकायदायक स्थितीत ट्रान्सफॉर्मर व फ्युजपेट्या आहेत. त्यातील काहींना दरवाजे नसल्याने त्यातील वायरी बाहेर लोंबकळत आहेत. संबंधित वायरमधून विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यापासून मोठा अनर्थ होण्याची शक्यता असते. शहरात काही ठिकाणी वीजवितरण कंपनीने भूगर्भांतर्गत वीजवाहक तारांच्या जोडण्या केल्या आहेत.
शहर व वाढीव हद्दीतील नागरिकांच्या सोयीसाठी सर्व ठिकाणी प्रकाशाची उत्तम सोय करत मुख्य रस्ते व चौकाचौकातून सोडियम व्हेपर लॅम्पस् व मर्क्युरी दिवे बसविण्यात आले. लाखो रुपये वर्षाला मर्क्युरी दुरुस्ती व बल्ब बदलण्यासाठी खर्च करूनही आजही शहरातील अनेक ठिकाणी अंधाराची परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)
पथदिव्यांसंदर्भात तक्रार निवारण केंद्रही
पालिकेत स्टोअरकीपर म्हणून एक विभाग आहे. या ठिकाणी गेल्यास तेथे पालिकेतील वायरमन किंवा पालिका स्टोअरकीपर भेटतात. त्यांच्याकडे एक रजिस्टर असते. त्या रजिस्टरमध्ये तक्रार नोंदविल्यास दोन ते तीन दिवसांत तक्रारीची दखल घेतलेली असते.
रात्रीच्या ‘उजेडा’साठी महिन्याला चार लाख
पालिकेकडून शहरातील चौकात तसेच अंतर्गत भागात बसविण्यात आलेल्या मर्क्युरी दिव्यांचे बिल हे महिन्याकाठी तीन ते चार लाख रुपये इतके येते. पालिका महिन्याकाठी निव्वळ तीन ते चार लाख रुपये शहरात ‘उजेड’ पाडण्यासाठी खर्च करीत आहे.
अकरा ठिकाणी मृत्यूला निमंत्रण
शहरातील अकरा ठिकाणी सध्या अत्यंत धोकादायक ट्रान्सफॉर्मर व फ्युजबॉक्स आहेत. काहीच्या संरक्षक काचा फुटलेल्या आहेत तर काहींची भंगारात घालण्यासारखी अवस्था झाली आहे. हे फ्युजबॉक्स व ट्रान्सफॉर्मर मृत्यूला निमंत्रण देत आहेत.