शिवसेनेला बळ; काँग्रेस ‘बॅकफूटवर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:37 AM2021-01-20T04:37:32+5:302021-01-20T04:37:32+5:30
रामापूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही पाटण तालुक्यात महाविकास आघाडीचा धर्म पाळला गेलेला नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून केवळ ...
रामापूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही पाटण तालुक्यात महाविकास आघाडीचा धर्म पाळला गेलेला नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून केवळ दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढल्या गेल्या. तर तालुक्याच्या राजकारणात एकेकाळी ‘किंगमेकर’ची भूमिका साकारणारी काँग्रेस या निवडणुकीत बॅकफूटवर गेली असून केवळ एका ग्रामपंचायतींवर त्यांना आपली सत्ता आणता आली आहे.
पाटण तालुक्यात कोणतीही निवडणूक असली तरी ती दोन पारंपरिक गटात आणि दोन पक्षातच लढली जाते. आजपर्यंतचा हा इतिहास आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर पदवीधर आणि शिक्षकच्या निवडणुकीत पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर दिसले. ती निवडणूक एकत्र लढली गेली. आणि त्यामध्ये यशही मिळाले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकाही अशाच एकत्रात होतील, अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. अनेक जाणकारांचे तेच मत होते. मात्र, तसे झाले नाही. तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर ७२ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष निवडून लागली. या ७२ पैकी फक्त दोन ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढली गेली. उर्वरित सर्व ग्रामपंचायतीत देसाई आणि पाटणकर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर आले. तर काही ठिकाणी खुर्चीसाठी पक्ष, गट बाजूला सारत सोयीच्या आघाड्या केल्याचे दिसले. काही ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेअंतर्गत गटांमध्येच निवडणूक लढली गेली.
ग्रामपंचायतीचा निकाल हा निश्चितच शिवसेनेला बळ देणार आहे. तर राष्ट्रवादीला चिंतन करायला लावणारा आहे. या निवडणुकीत काँग्रेस म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात आक्रमक भूमिकेत दिसली नाही. काँग्रेसचे समर्थक कोठेही निवडणूक प्रक्रियेत दिसले नाहीत. त्यामुळे काँग्रेसची मोठी पीछेहाट झाल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट होत आहे.