डोंगरी मावळ्यांच्या ‘पावसाळी लढाई’ला बळ

By admin | Published: June 16, 2015 01:21 AM2015-06-16T01:21:55+5:302015-06-16T01:21:55+5:30

कांदाटी खोऱ्यात उपक्रम : संपर्क तुटण्यापूर्वीच पोहोचली औषधे; मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज संघटनेचे साह्य--वन-जन जोडो अभियान...

Strengthen the 'rainy battle' of the hill ranges | डोंगरी मावळ्यांच्या ‘पावसाळी लढाई’ला बळ

डोंगरी मावळ्यांच्या ‘पावसाळी लढाई’ला बळ

Next

राजीव मुळ्ये ल्ल सातारा  -पावसाळ्यात किमान दोन-अडीच महिने ज्यांचा जगाशी संपर्क तुटतो, त्या डोंगरी मावळ्यांच्या एकाकी लढाईला यावर्षी ‘वन-जन जोडो’ अभियानाचे भक्कम पाठबळ लाभले. कांदाटी खोऱ्यातील प्रमुख पाच आणि एकूण तेरा गावांमध्ये पावसाळ्यात पुरेल एवढा औषधसाठा पाऊस सुरू होण्यापूर्वीच पोहोच झाला. महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशनच्या सातारा युनिटने कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली.
खडतर आणि कष्टप्रद जीवन असणाऱ्या दुर्गम कांदाटी खोऱ्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्थानिकांचा जीवनसंघर्ष सुरू असतो. डोंगरात वाहनेच चालत नसल्यामुळे अवजड वस्तूही खांद्यावरूनच उचलून न्याव्या लागतात.
अपार कष्ट केल्यामुळे या मंडळींना प्रामुख्याने सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. मणक्यांचे विविध आजार होऊन मान, पाठ, कमरेच्या वेदना
सुरू होतात. पावसाळ्यात हे
आजार अधिक प्रमाणात डोके वर काढतात.
नेमक्या याच वेळी या डोंगरी माणसांचा जगाशी संपर्क तुटलेला असतो. म्हाळुंगे, मोरणी, अरव, वलवण, शिंदी या प्रमुख पाच गावांसह १३ गावे एकाकी पडतात. शिवसागर जलाशयातील लाँचसेवा पूर्णत: बंद असते. बससेवा खेडपासून (कोकण) शिंदीपर्यंत आहे. तीही पावसाळ्यात बेभरवशाची असते. अतिपाऊस, दरड कोसळणे या कारणांनी बसही अनेकदा येत नाही. अशा वेळी आजार झाल्यास रुग्णाचे अतोनात हाल होतात. जीवरक्षक प्रणाली आसपास कुठेच उपलब्ध नाही.
वन्यजीव विभाग आणि ‘ड्रोंगो’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे या भागात सप्टेंबर २०१४ पासून ‘वन-जन जोडो’ अभियान सुरू आहे. या मोहिमेद्वारे स्थानिकांना केवळ पर्यायी उत्पन्नस्रोत आणि पायाभूत सुविधा पुरविणे एवढेच उद्दिष्ट न मानता एकंदर कल्याण डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी पावसाळ्यापूर्वीच ग्रामस्थांना औषधे घरपोच करण्यात आली. थंडीताप आणि सर्वसाधारण आजारांबरोबरच सांधे, मणके आणि पाठीच्या आजारांवरील औषधे या भागात अधिक प्रमाणात देण्यात आली आहेत. अ‍ॅलोपथी आणि आयुर्वेदिक औषधेही या मोहिमेत देण्यात आली. ग्रामस्थांना औषधांची व्यक्तिगत पाकिटे देण्यात आली असून, कोणते औषध कोणत्या आजारावर, कसे, किती आणि कधी घ्यायचे, याबाबत सूचना प्रत्येक पाकिटासह देण्यात आल्या आहेत.
विभागीय वनअधिकारी एम. एम. पंडितराव, सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल ए. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सुनील भोईटे, डॉ. अश्विनी माळकर यांच्यासह वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.


स्थानिक रोपांना ‘ब्रँड व्हॅल्यू’
‘वन-जन जोडो’ अभियानांतर्गत या खोऱ्यात प्रायोगिक तत्त्वावर रोपवाटिका सुरू करण्यास प्रारंभ झाला आहे. स्थानिक अधिवासात वाढू शकतील, अशी दुर्मिळ रोपे तयार करून त्यांना ‘ब्रँड व्हॅल्यू’ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या दÞृष्टीने ग्रामस्थांना रोपांची यादी देण्यात आली होती. स्थानिकांनी या झाडांच्या बिया गोळा केल्या असून, यंदाच्या पावसाळ्यात त्या गादीवाफ्यावर पेरण्यात येतील. उगवण झाली की रोपे पिशवीत कशी भरायची याचे प्रशिक्षण ‘ड्रोंगो’ने स्थानिकांना दिले आहे. भविष्यकाळात गावठी आंब्याचे उत्कृष्ट वाण, कापा फणस , मोठे जांभूळ, पांढरा पळस, कदंब, गारदर वेल, बकुळ अशी रोपे या वाटिकेत तयार होतील आणि त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल.

Web Title: Strengthen the 'rainy battle' of the hill ranges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.