मलकापुरात निर्जंतुकीकरण करणाऱ्या यंत्रणेवर ताण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:41 AM2021-05-09T04:41:09+5:302021-05-09T04:41:09+5:30
मलकापूर : पालिका कार्यक्षेत्रामध्ये वाढत्या कोरोनाच्या अनुषंगाने शहरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात वाढ झाली आहे. पालिकेकडून तातडीने बाधित क्षेत्र निर्जंतुकीकरण ...
मलकापूर : पालिका कार्यक्षेत्रामध्ये वाढत्या कोरोनाच्या अनुषंगाने शहरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात वाढ झाली आहे. पालिकेकडून तातडीने बाधित क्षेत्र निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी केली जात आहे. शहरातील विविध कॉलन्यांमधून बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे फवारणीच्या कामासाठी असलेल्या यंत्रणेवर ताण येत असून, अवेळी फवारणी होत आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
मलकापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच पालिकेने योग्य ती खबरदारी व उपाययोजना केल्या होत्या. कोरोनाची भीती असूनही कर्मचारी प्रत्यक्ष फिरून औषध फवारणी करत होते. मात्र, एप्रिल महिन्यात कोरोनाने कहर केला आहे. एका महिन्यात तब्बल ४५३ पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात सरासरी दिवसाला किमान १५ बाधित सापडले आहेत, तर १६ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मलकापुरात सध्या तब्बल २२४ ॲक्टिव्ह रुग्ण असल्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. ॲक्टिव्ह रुग्णांपैकी १११ रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरू आहेत तर तब्बल ११३ रुग्ण विविध कॉलन्यांमधून गृहविलगीकरणांमध्ये राहून घरीच उपचार घेत आहेत. शनिवारी (दि. ८) मलकापुरात पाचपेक्षा जास्त रुग्ण सापडलेले पाच ठिकाणे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली. पालिकेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्या आदेशाने नोडल अधिकारी रामभाऊ शिंदे, जयश्री देसाई, आरोग्यसेविका एस.डी. पावने, आर.एस. पाथरवट, राजू पटेल व इंदोलकर यांनी ही ठिकाणे सील केली आहेत. तसेच शहरात गल्लोगल्ली कोरोनाबाधितांचे वास्तव्य असल्यामुळे पालिकेला संबंधित भागात निर्जंतुकीकरण करावे लागत आहे. वाहनांद्वारे शहरातील रस्ते, गटार, गल्ली, बोळ, कोरोना विषाणू आढळून आलेल्या इमारतीत सर्वत्र सोडियम हायप्रोक्लोराइडची फवारणी केली जात आहे. मात्र, शहरातील बाधित क्षेत्रांची संख्या विचारात घेता पालिकेकडील औषध फवारणीसाठी असलेल्या यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे वेळेत निर्जंतुकीकरणात अडथळे निर्माण होत आहेत. यासाठी पालिकेने यंत्रणेत वाढ करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
चौकट
पाच सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र...
एखाद्या इमारतीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास ती इमारत किंवा अपार्टमेंट सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा शासनाचा नियम आहे. या नियमानुसार मलकापुरात शनिवारी (दि. ८) पाच ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ती सील केली आहेत.
चौकट
प्रभागनिहाय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र
प्रभाग २ - १
प्रभाग ४ - १
प्रभाग ८ - २
प्रभाग ९ - १
०८मलकापूर
फोटो : मलकापुरात विविध ठिकाणच्या पाच इमारतीत पाचपेक्षा जास्त कोरोनाबाधित सापडल्यामुळे पालिकेच्या वतीने संबंधित इमारतींना बॅरिकेट लावून सील केल्या आहेत. (छाया : माणिक डोंगरे)