मराठा आरक्षणासाठी सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 01:30 PM2023-11-01T13:30:51+5:302023-11-01T13:32:05+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले
सातारा : मराठा आरक्षणासाठी क्रांती मोर्चाने दिलेल्या सातारा जिल्हा बंदच्या हाकेला मंगळवारी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो आंदोलकांनी जोरदार घोषणा, टाळमृदुंगाच्या गजरात भजन गात परिसर दणाणून साेडला. गोंदवले येथे एका एसटीवर अज्ञातांनी दगडफेक केली. यामुळे दहिवडी आगारातील एसटी फेऱ्या काही काळ बंद केल्या होत्या.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत साखळी उपाेषणाच्या पाचव्या दिवशी शेकडो आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले. राजकीय नेत्यांनी मराठा आंदोलकांच्या मंडपात येण्यापेक्षा मुंबईला विधिमंडळात जावे, विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. सातारा शहरातून शेकडो आंदोलकांनी दुचाकी रॅली काढली. यावेळी जिल्ह्यात सुमारे साडेपाचशे गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
फलटणमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, मंगळवारी सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथे शासनाच्या धोरणाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी राजीनामे सरपंच वनिता राऊत यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
जावली तालुक्यातील मेढा, कुडाळ, केळघर, करहर, आनेवाडी बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बाजारपेठेत सगळीकडे शुकशुकाट दिसत होता. मेढा येथे मराठा बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
खंडाळा तालुक्यात शिरवळ, शिदेंवाडी, पळशी, भादे, भोळी आदी विविध ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदमुळे खटाव बाजारपेठेतही शुकशुकाट हाेता.
शासकीय कार्यालयातही वर्दळ कमी
सातारा शहरातील विविध शासकीय विभागांच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी तसेच मागण्यांसाठी येणाऱ्या लोकांची वर्दळ कमी होती. मंगळवारी जिल्हा बंद असल्याने शासकीय कार्यालयात कामासाठी आलेले लोक तुरळक प्रमाणातच दिसत होते.
परीक्षेवरच बहिष्कार
संपूर्ण माण तालुक्यात अत्यावश्यक सेवावगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. गोंदवले येथे उभ्या असलेल्या गाडीवर रात्री दगडफेक करण्यात आली. तर, दहिवडी येथील महात्मा गांधी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावर आंदोलन केले. आरक्षण नाही तर शाळा नाही म्हणत परीक्षेवरच बहिष्कार टाकला.