पाटण शहरात कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:37 AM2021-04-11T04:37:35+5:302021-04-11T04:37:35+5:30
रामापूर : पाटण शहरात शनिवारी सकाळपासून पूर्णतः कडक असा लॉकडाऊन पाळण्यात आला. नगरपंचायत हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ...
रामापूर : पाटण शहरात शनिवारी सकाळपासून पूर्णतः कडक असा लॉकडाऊन पाळण्यात आला. नगरपंचायत हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शहर प्रशासन, तालुका प्रशासन, पोलीस प्रशासनच्या वतीने ठिकठिकाणी गस्त घालत होते त्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला.
गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात आणि शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चांगलीच वाढ झाली आहे. नागरिक बाजारात आणि शहरात ठिकठिकाणी गर्दी करत होते. यामुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढते आहे.
कोरोनाबाधितची साखळी तोडायची आहे, त्यासाठी लॉकडाऊन घेतल्याशिवायही साखळी तुटणार नाही, म्हणून जिल्ह्यातील प्रशासनाच्या वतीने वीकेंड लॉकडाऊन शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्याला पाटण शहरातील दुकानदार, व्यापारी यांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ आणि मुख्य चौकात आज सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळाला. रस्त्यात फारशी वाहने नव्हती, शहरात चौकात असणाऱ्या रिक्षाही पाहायला मिळत नव्हत्या. शाळा, कॉलेज, खासगी क्लासेसही बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पाटण शहरातील नागरी, व्यापारी यांनी वीकेंडचा लॉकडाऊन चांगलाच पाळला.
शहरातील नगरपंचायतीच्या वतीने सांगितलेल्या सूचनांचे पाटणमधील नागरिक, व्यापारी, सर्व दुकानदार पालन करताना दिसत आहे, असेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाटण नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अभिषेक परदेशी आणि नगराध्यक्ष अजय कवडे यांनी केले.
फोटो : पाटण शहरातील मुख्य बाजारपेठमधील रस्ते सुनसान.