शिरगावमध्ये कडक लॉकडाऊन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:25 AM2021-07-04T04:25:57+5:302021-07-04T04:25:57+5:30
वेळे : वाई तालुक्यातील शिरगावमध्ये कोरोनाच्या थैमानामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून दोन महिन्यांच्या बाळासह ४२ जण कोरोनाबाधित झाल्याने ...
वेळे : वाई तालुक्यातील शिरगावमध्ये कोरोनाच्या थैमानामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून दोन महिन्यांच्या बाळासह ४२ जण कोरोनाबाधित झाल्याने व गावात आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याची गंभीर दखल तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी घेऊन शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेल्या ३६ रुग्णांची माहिती घेऊन त्यांचा अहवाल प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांना देऊन त्यांनी तातडीने शिरगाव संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले.
शिरगावमध्ये शासनाचे आरोग्य उपकेंद्र असूनही दुर्दैवाने या केंद्रातील यंत्रणा अपुरी पडल्यामुळे जानेवारी महिन्यापासून एकूण कोरोनाबाधित रुग्ण १८४, सध्याचे बाधित रुग्ण ४२, हायरिस्क तपासणी रुग्ण २६५, लो रिस्क तपासणी रुग्ण ११० तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगाव येथे ग्रामपंचायतमार्फत उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये ३६ रुग्ण दखल झाले आहेत. त्यापैकी ग्रामीण रुग्णालयात २, गीतांजली हॉस्पिटल १, पतंगे रुग्णालय १, जम्बो सातारा १, मॅप्रो रुग्णालय १ असे एकूण ४२ रुग्ण या गावात सापडल्याने व आजअखेर गावातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भेट देऊन पाहणी केली असता वाई वाठार रस्त्यावरील रामोशी वस्तीमध्ये २० बाधित रुग्ण, बसस्थानकावर ६ बाधित रुग्ण व गावात १२ ते १३ बाधित रुग्ण सापडल्याची माहिती या दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतली. कोरोनाने या गावात घातलेला धुमाकूळ थांबविण्यासाठी गावातील किराणा, कापड दुकान, पीठ गिरणी, हॉटेल, सलून, दूध डेअरी, व्यावसायिक चालक व शेतमजूर या सर्वांनी गाव सोडून जाऊ नये, यासाठी लॉकडाऊनचे आदेश तहसीलदार रणजित भोसले यांनी शनिवारी गावामध्ये गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य मधुकर भोसले, सरपंच उज्ज्वला भोसले, उपसरपंच दीपक शिंदे, आपत्ती व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गावकामगार तलाठी घम्ब्रे, ग्रामपंचायत सदस्य रमेश शिंदे, रघुनाथ भोसले, अमोल जेधे, नीलम भोसले, मंगल भोसले, दैवता भोसले, माजी सरपंच दीपक तोडरमल, नितीन भोसले, डॉ. सचिन राठोड, पोलीस पाटील उज्ज्वला भोसले, ग्रामसेवक एस. आर. राऊत यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन गाव पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले.
चौकट..
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई...
गावातील सर्व व्यवहार व व्यवसाय आजपासून ११ जुलैपर्यंत पूर्णत: आपत्ती व्यवस्थापन समिती शिरगाव व ग्रामपंचायत आदेशानुसार बंद राहणार आहेत. लॉकडाऊन काळात घराच्या विनामास्क बाहेर पडल्यास ५०० रुपये दंडात्मक कारवाई व नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
०३वेळे
शिरगाव, वाई येथे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.