कडक लॉकडाऊनमुळे खरेदीसाठी गर्दी उसळली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:37 AM2021-04-15T04:37:41+5:302021-04-15T04:37:41+5:30
सातारा : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला असून त्याची अंमलबजावणी बुधवारी रात्रीपासून होणार आहे. ...
सातारा : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला असून त्याची अंमलबजावणी बुधवारी रात्रीपासून होणार आहे. यामुळे सातारकरांनी साहित्य खरेदीसाठी बुधवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. काही दुकानांपुढे तर रांग लावण्यात आली होती. नागरिकांचा अधिककरून किराणा साहित्य खरेदीवरच भर असल्याचे दिसून आले.
मागील एक वर्षापासून कोरोना महामारीचे संकट सुरू झालेले आहे. पहिल्या लाटेच्यावेळी मार्चपासून जवळपास सहा महिने लॉकडाऊन होता. लोकांवर अनेक बंधने आली होती. तेव्हा कुठे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले. कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आला. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले. तर, नागरिकांनीही नियमही पायदळी तुडवले. त्यातूनच आताची परिस्थिती उद्भवली आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही बाधित मोठ्या संख्येने सापडू लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने मागील आठवड्यात काही निर्बंध घातले. पण, कोरोना रुग्ण काही केल्या कमी होईनात. त्यामुळे कडक लॉकडाऊनचे संकेत राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिलच्या रात्रीपासून ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच कलम १४४ ही लागू करण्यात आलेले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. मात्र, लोकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेरच पडता येणार नाही. त्यामुळे सोमवार, मंगळवारप्रमाणेच बुधवारी सकाळपासूनच नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते.
सातारा शहरात तर बुधवारी सकाळपासूनच दुकानांसमोर गर्दी झाली होती. त्यामुळे दुकानांपुढे रांग लागल्याचे दिसून आले. तसेच वाहनधारकही मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने वाहतुकीची कोंडी झालेली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. सायंकाळपर्यंत दुकानात गर्दी होती. त्यामुळे दुकानदारांना रांगा लावताना वारंवार सांगावे लागत होते. तसेच वेळोवेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याबाबतही सूचना करण्यात येत होती.
चौकट :
राजवाडा, मोती चौक परिसरात गर्दी...
सातारा शहरात वीकेण्ड लॉकडाऊननंतर सोमवारी दुकाने उघडली. तेव्हा सातारकरांनी तुफान गर्दी केली होती. दुकाने तसेच भाजी मंडईत सातारकर कोरोना नियम न पाळताच खरेदी करत होते. काही प्रमाणात मंगळवारीही खरेदीसाठी गर्दी दिसून आली. तर, बुधवारी रात्रीपासून लॉकडाऊन सुरू होत असल्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी किराणा मालाच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे राजवाडा परिसर, मोती चौक, ५०१ पाटीपर्यंत गर्दी दिसून आली.
फोटो दि.१४सातारा गर्दी...
फोटो ओळ : सातारा शहरात बुधवारी नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले. यामुळे किराणामालाच्या दुकानाबाहेर रांग लागली होती. (छाया : नितीन काळेल)
..........................................................