आठवडा बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालयांवर कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:54 AM2021-02-25T04:54:22+5:302021-02-25T04:54:22+5:30
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यातील आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स, आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन ...
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यातील आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स, आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कोेरोनाच्या अनुशंगाने लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले बहुतांश निर्बंध हटविण्यात आले आहे. निर्बंध शिथिल झाल्याने विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणत गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात दि. २५ फेब्रुवारीपासून रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स, आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे, तसेच कोरोनाच्या अनुषंगाने वेळोवेळी लागू करण्यात आलेल्या आदेशातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. आदेशाचा भंग झाल्यास संबंधित व्यवस्थापनाकडून प्रथमवेळी २५ हजारांचा दंड, तसेच दुसऱ्यांदा भंग झाल्यास एक लाख दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.